मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात सुमारे ८ महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. शेतकरी संघटनांनी देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनासाठी आंदोलनाची रुपरेषा जाहीर केली आहे. शेतकरी यंदाचा स्वातंत्र्य दिन ‘शेतकरी-मजूर आझादी संग्राम दिवस’ म्हणून साजरा करणार आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या आवाहनानंतर देशभरातील शेतकरी आपले जिल्हे, तालुके या ठिकाणी ‘तिरंगा रॅली’ काढणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या अनुभवानंतर शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे.
शेतकरी कसे करणार आंदोलन?
- अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या कविता कुरुगंती यांनी स्वातंत्र्यदिनी ठरवलेल्या शेतकऱ्यांच्या कार्यक्रमांची रुपरेखा सांगितली.
- संयुक्त किसान मोर्चाने सर्व घटक संघटनांना १५ ऑगस्ट रोजी हा दिवस ‘शेतकरी-मजदूर आझादी संग्राम दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
- या दिवशी शेतकरी आणि शेतमजूर विभाग, तहसील, जिल्हा मुख्यालयांवर आंदोलन करतील.
- तिरंगा मोर्चात ट्रॅक्टर, मोटर बाईक, सायकल आणि बैलगाडी इत्यादी घेऊन शेतकरी सहभागी होतील.
- देशभरात सकाळी ११ ते दुपारी १ पर्यंत तिरंगे मोर्चे काढण्यात येणार आहेत.
दिल्लीच्या सीमांवर…पण दिल्लीपासून दूर!
- दिल्लीतही सिंघू सीमा, टिकरी सीमा आणि गाझीपूर सीमेवर तिरंगा मोर्चे काढले जातील.
- दिवसभर कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
- शेतकरी १५ ऑगस्टला तिरंगा रॅली शांततेत आणि दिल्लीपासून दूर काढणार आहेत.
शेतकरी नेते जगमोहन सिंह यांनी सांगितले की, २६ जानेवारीच्या प्रकारामुळे आमच्या आंदोलन बदनाम केले आहे, त्यामुळे १५ ऑगस्टला तिरंगा मोर्चा दिल्लीत होणार नाही, परंतु आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचे आंदोलन सुरुच राहणार.