मुक्तपीठ टीम
न्यायालयाने शाळेची १५ टक्के शुल्क वसुलीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार शासनाला दिले आहेत. मात्र याला विरोध करत पालक संघटनांनी फक्त शिकवणी शुल्क आकारण्यात यावे, अशी मागणी केली आहे. या अनुषंगाने नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि राज्यातल्या इतर शहरातल्या पालक संघटनांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. यावेळी वर्षा गायकवाड यांनी पालक संघटनांच्या सर्व तक्रारी जाणून घेतल्या आणि पालकांच्या सगळ्या तक्रारी राज्य तक्रार निवारण समितीकडे सुपूर्द करण्याचे आदेश देऊन तातडीने यावर निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत.
नवी मुंबई पालक संघर्ष कृती समिती, मुंबई पालक समिती, पनवेल पालक संघटना, शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकारी यासह विविध पालक संघटनांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेतली. आमदार विनायक मेटे हे देखील यावेळी उपस्थित होते. तसंच यावेळी विकास सोरटे, बाळासाहेब शिंदे, सत्यवान गायकवाड, प्रफुल्ल पवार, विवेक सावंत, संदीप भोईटे हे या शिष्टमंडळात सहभागी झाले होते. यानंतर शिष्टमंडळाने शिक्षण उपसंचालक संदीप संगवे यांची भेट घेवून त्यांनाही आपल्या अडचणी सांगितल्या.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुल्क रचनेबाबत निर्णय घेण्याचे संकेत
- पालकांनी फी वसुलीसाठी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गातून काढत आहेत अशी तक्रार केली आहे.
- वाढीव शुल्क वसुलीसाठी तगादा लावल्याचे पालकांनी शिक्षणमंत्र्यांना सांगितलं आहे.
- या तक्रारींची माहिती घेऊन संबंधित शाळांची माहिती तातडीने तक्रार निवारण समितीकडे पाठवून यावर कारवाई करण्याचे निर्देश शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलेत.
- मंत्रिमंडळाच्या बैठकीत शुल्क रचनेबाबत निर्णय घेणार असल्याचेही संकेत त्यांनी दिलेत.
- शिक्षणमंत्र्यांनी शुल्काबाबत दिलेला प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे.
- मंत्रिमंडळ बैठकीत दोन आठवड्यांपूर्वी निर्णय घेण्यात आला होता. मात्र यावर पुन्हा होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल, असं वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.