मुक्तपीठ टीम
चालत्या रेल्वेमध्ये पुण्याहून कोल्हापूरला जाणाऱ्या एका कुटुंबात २ वर्षाच्या चिमुरड्याच्या हृदयाचे ठोके थांबले. निरागस चिमुरड्याला पाहून रेल्वेत खळबळ उडाली. पालकांना समजत नव्हते की काय करावे. मग देवदूत म्हणून आलेल्या तिकीट कलेक्टरने वेळेवर सीपीआर देऊन मुलाचे प्राण वाचवले. मुलाचा परतलेला श्वास पाहून कुटुंबाच्या जीवात जीव आला.
कोल्हापूरच्या दिशेने पुणे रेल्वे स्थानकावरून जाणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये रविवारी ही घटना घडली आहे. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हे कुटुंब सांगलीला जात होते. प्रवास सुरू करण्यापूर्वी मुलाची तब्येत ठीक होती. पण वाठार स्टेशनवर गेल्यानंतर मुलाची तब्येत बिघडू लागली आणि हळूहळू त्याचा श्वास थांबला आणि त्याचे डोळे पिवळे झाले. हे पाहून सर्वांना कुटुंब जीव वर-खाली झाला. डब्यातील इतर प्रवासीही मदत करू शकले नाहीत.
तिकीट कलेक्टरकडून चिमुरड्याला मदत
ही घटना उघड होताच रेल्वेच्या डब्यात उपस्थित असलेले तिकीट कलेक्टर राजेंद्र काटकर मदतीसाठी पुढे आले. त्यांनी मुलाला तोंडातून सुमारे १० ते १५ मिनिटे श्वास दिला. असे असूनही, मुलाच्या स्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही. शेवटी, १५ मिनिटांनंतर, त्यांची मेहनत यशस्वी झाली आणि चिमुरडा रडू लागला. हे पाहून डब्यातील प्रत्येकजण आनंदी झाला.