मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रावर कोसळलेली महाआपत्ती म्हणून उल्लेख होत असलेल्या कोकणातील महापूरग्रस्तांच्या मदतीसाठी आता माणुसकीचा महापूर ओसंडू लागलाय. चारी दिशांमधून आता आपल्या माणसांना संकटात मदत करण्यासाठी लोक सरसावू लागले आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
महाड – पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण भागांप्रमाणेच चिपळूण येथेही आरोग्य शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील महाड येथील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकात पुढील सलग चार दिवस आरोग्य शिबिर चालवले जाणार आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ जे. बी.भोर यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथक वैद्यकीय सेवा देत आहे. डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशन टीम आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या सहा वैद्यकीय सहायकांचे आरोग्य शिबीरासाठी मोठे योगदान आहे. औषध वाटप नियोजन आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या रुग्णवाहिकेची केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही पाहणी केली.
रुग्णवाहिकेतून आरोग्य शिबिराचे माहिती प्रसारण
महाडमध्ये रूग्णवाहिकेच्या माईक आणि स्पीकरचा उपयोग करुन स्थानिक आमदार भरतजी गोगावले यांचे चिरंजीव विकास गोगावले यांच्या सहकार्याने आरोग्य शिबीर आयोजनाबद्दल माहिती प्रसारीत करण्यात आली. संपूर्ण महाड शहरात फेऱ्या मारून नागरिकांना आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा आणि आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन केले गेले.