मुक्तपीठ टीम
मुसळधार कोसळणार्या पावसामुळे सतत अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्कात राहून सांगली, कोल्हापूर आणि सातारा भागातील पूरपरिस्थितीचा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आढावा घेत आहेत. गुरुवारी ते संपूर्ण रात्रभर संपर्कात होते. आज सकाळी संपूर्ण आढावा घेतल्यानंतर त्यांनी सांगतिले की, “महाराष्ट्रातील धरणांमधून पाण्याचा योग्य विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणाच्या पाण्याबाबतही नियंत्रण ठेवले जात आहे. प्रशासन मोठ्या जोमाने काम करत आहे, आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. पुढील २-३ दिवसात पावसाची तिव्रता कमी झाली तर पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात होईल आणि मोठे संकट टळेल.”
शुक्रवारी सकाळी पुण्यातील नियोजित कार्यक्रम उरकून जनतेच्या चिंतेने जयंत पाटील सांगलीत दाखल झाले. पुण्यात नियोजित कार्यक्रम सुरू असतानाही आणि कार्यक्रम संपल्यानंतर सांगलीकडे रवाना होताना गाडीतही जयंत पाटील हे सांगली, कोल्हापूर, सातारा या विभागातील पूरपरिस्थितीचा आढावा घेताना नियोजन कसे करायचे याची चर्चा अधिकार्यांशी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते.
पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा
सांगली जिल्ह्यात शुक्रवारी सरासरी ५९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात १५४.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने कृष्णा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने सांगलीकरांवर पुन्हा एकदा २०१९ च्या महापुराचे सावट निर्माण झाले आहे याच चिंतेने मंत्री जयंत पाटील यांनी परिस्थितीची माहिती घेतली.
पश्चिम महाराष्ट्रातील २०१९ चा पूर आठवला की अनेकांना झोप लागत नाही. मागच्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रात त्याच तीव्रतेचा पाऊस पडत आहे आणि पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. मागचा अनुभव लक्षात घेता नागरिकांचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे