मुक्तपीठ टीम
‘पेगॅसस’ स्पायवेअरच्या मुद्द्यावरून राज्यसभेत गुरुवारी विरोधकांनी प्रचंड गदारोळ घातला. गुरुवारी, तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हातातील कागद हिसकावून घेत ते फाडून हवेत भिरकावले. यासंदर्भात त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. शांतनू सेन यांच्या अशोभनीय वर्तनासाठी त्यांना राज्यसभेच्या उर्वरीत सत्रासाठी निलंबित करण्यात आलं आहे.
नेमकं काय घडलं राज्यसभेत?
- गुरुवारी, माहिती व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव मोबाईलमध्ये हेरगिरी करणाऱ्या पेगॅसस स्पायवेअरवर मोदी सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत होते.
- यावेळी त्यांच्या हातातील निवेदन तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांनी हिसकावले आणि ते फाडून उपसभापती हरिवंश यांच्या दिशेने भिरकावले.
- गोंधळामुळे वैष्णव यांनी आपले निवेदन सभागृहाच्या पटलावर मांडले.
- या प्रकारामुळे भाजपाचे सदस्यही आक्रमक झाले.
- तृणमूलचे सदस्य आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यामध्ये बाचाबाची सुरू झाली.
- अखेर त्यांची भांडणे सोडवण्यासाठी सभागृहातील मार्शलना मध्यस्थी करावी लागली.
- पुरी आणि तृणमूलच्या नेत्यांमध्ये मारहाण झाली.
- यावेळी एका केंद्रीय मंत्र्याने अतिशय अश्लिल भाषेचा वापर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
- गदारोळ सुरू राहिल्याने सभागृह दिवसभरासाठी तहकूब केले गेले.
- तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनू सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी शांतनू सेन यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. - यावर, पश्चिम बंगालमधील हिंसेची संस्कृती संसदेत आणण्याचा प्रयत्न तृणमूल काँग्रेसकडून केला जात असल्याचा आरोप अश्विनी वैष्णव यांनी केला.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी लोकसभेतही विरोधकांनी कामकाज होऊ दिले नाही. सभागृहाचे कामकाज सुरू होताच काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, द्रमुक, अकाली दल या पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दुपारी ४.०० वाजेपर्यंत तीन वेळा स्थगित होऊन दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं. तर, राज्यसभेच्या कामकाजात दोन वेळा व्यत्यय निर्माण होऊन दुपारी ३.०० वाजता दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं.