मुक्तपीठ टीम
मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे तसेच पालिका आयुक्तांकडून बचाव कार्याची माहिती घेतली. एनडीआरएफ, महानगरपालिका, अग्निशामक दल आणि पोलीस यांनी समन्वयाने बचाव कार्य सुरु ठेवावे व जखमींना तातडीने रुग्णालयांत हलवून व्यवस्थित उपचार मिळतील असे पाहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
मृतांच्या वारसांना शासनाकडून प्रत्येकी ५ लाख रुपये देण्याचे आणि जखमींवर मोफत उपचार केले जातील असेही त्यांनी जाहीर केले आहे. मुंबईत रात्रभर पाऊस सुरु असून मुख्यमंत्री स्वत: पालिकेच्या नियंत्रण कक्षाकडून सातत्याने माहिती घेत आहेत. आजही पाऊस सुरूच राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज असल्याने सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे व कुठेही दुर्घटना घडल्यास त्वरित बचाव कार्य सुरु ठेवावे व मदत पोहचवावी असेही त्यांनी निर्देश दिले आहेत. मुंबईतील मिठी नदी व इतर मोठ्या नाल्यांलगत पाणी वाढल्यास आसपास राहणाऱ्या रहिवाशांना मोठ्या प्रमाणावर त्रास होऊ शकतो हे पाहून त्यांना प्रसंगी स्थलांतरित करावे.
मुंबईत मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे.#MumbaiRains
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 18, 2021
कोरोना संसर्ग लक्षात घेऊन जम्बो केंद्रामधील रुग्ण तसेच इतर साधन सामुग्री यांची काळजी घ्यावी व सावध राहण्यास देखील मुख्यमंत्र्यांनी पालिकेस सांगितले आहे.
पावसामुळे जिथे जिथे पाणी साचले आहे त्या ठिकाणी पाण्याचा निचरा करणारी यंत्रणा व्यवस्थित कार्यान्वित करावी, रस्ते मोकळे करावेत , वाहतुकीवर परिणाम झालेला आहे. मात्र, लवकरात लवकर ती सुरळीत होईल असे पाहावे, रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी देखील रेल्वे वाहतूक कशी पूर्ववत होईल हे बघण्याच्या सुचना मुख्यमंत्र्यांनी आज प्रशासनाला दिल्या.
मुंबई दुर्घटनांमधील मृत्यूंबद्दल उपमुख्यमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त;
मुंबईतील चेंबुर व विक्रोळी परिसरात पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनांबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून दुर्घटनेत मृत्यु पावलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
मुंबईतल्या चेंबुरच्या आरसीएफ परीसरातल्या भारतनगरमध्ये व विक्रोळी येथील दुर्घटनेच्या ठिकाणी एनडीआरएफ, अग्निशमन, महापालिका, पोलिस आदी यंत्रणांतर्फे तात्काळ बचाव व मदतकार्य सुरु करण्यात आले. अनेकांना ढिगाऱ्याखालून सुखरुप बाहेर काढण्यात बचावपथकांना यश आले. आपत्कालिन यंत्रणांकडून दुर्घटनास्थळीही तात्काळ बचावकार्य सुरु करण्यात आल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. दुर्घटनेतील जखमींवर शासनामार्फत मोफत उपचार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईतील चेंबूर व विक्रोळी परिसरात पावसामुळे भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! मी मृतांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबियांना शासनातर्फे पाच लाख रुपयांची मदत व जखमींवर मोफत उपचार करण्यात येतील.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) July 18, 2021
मुंबई शहर व राज्यातील अनेक जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्कालिन यंत्रणांनी सतर्क राहून परस्पर समन्वयाने काम करावे. नागरिकांनीही सुरक्षितताविषयक नियम व संदेशांचे पालन करुन काळजी घ्यावी. आपत्कालिन परिस्थितीत तात्काळ पोलिस किंवा नजिकच्या शासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
हे ही वाचा: मुंबईत पावसाच्या कोसळधारा, तीन ठिकाणी दरड, भिंत कोसळून मृत्यू