डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
जीवन अखंडित चक्रासारखे चाललेले आहे. त्याला गतीही आहे, आणि वेगही आहे. फरक फक्त एवढाच कोणाचा तो जास्त आहे कोणाचा कमी आहे. या चक्राचा सगळ्यात खालचा बिंदू कधीतरी वर जाणार आणि वरचा बिंदू खाली येणार. चक्रावरचे हे दोन बिंदू सुख आणि दु:ख मानले तर, प्रत्येकाच्या जीवनात सुखदु:खाचा चाललेला लपंडाव दिसून येतो. ‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे मना तूची शोधोनी पाहे’ समर्थांच्या या श्लोकात जीवनाचे सार सामावले आहे. हे खरे असले तरी वैष्णवांची गोष्टच काही वेगळी आहे. ‘पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची सोडूनिया वाट’ आयुष्यात कोणत्याही गोष्टीकडून अपेक्षा ठेवल्या की दु:खच पदरी पडत. या आयुष्यात सगळ्यात आसक्ती लावणारा विषय संसार आहे. या आसक्तीची विरक्ती केली की अपेक्षा भंगाचे दु:ख कमी होणार. कितीही केले तरी संसाराचा हा फेरा पार करून सगळ्यांनाच पैलतीरी जायाचे आहे.
दिंडी सोहळ्यात आत्मोन्नती करणाऱ्या अनेक गोष्टी घडत असतात. काही आपल्या लक्षात येत असतात तर काहीचा कार्यकारण भाव कळण्यासाठी काही काळ जावा लागतो. दिंडीच्या मार्गावर होणारा रिंगण सोहळा म्हणजे याचे उत्तम उदाहरण आहे. संपूर्ण मार्गात एकूण सात रिंगण सोहळे होतात. कोणत्याही सरळ रेषेला सुरुवातीचा आणि शेवटाचा बिंदू असतो. रिंगण म्हणजे वर्तुळ, कोणत्याही बिंदुपासून सुरू केल्यानंतर पुन्हा त्याच बिंदुला येऊन पोहोचणे म्हणजेच वर्तुळ पूर्ण होते. परमार्थात प्रवेश करण्यासाठी कोणतेही विशेष वय ठरवलेले नाही. आणि संसाराचा त्याग तर मुळीच अपेक्षित नाही. ज्याला जीवनाचा खरा अर्थ समजावून घ्यायचा आहे त्याने या वर्तुळात कधीही प्रवेश केला तरी चालतो. आणि वैष्णव धर्माचे पालन करीत तो जेव्हा पुन्हा ‘को अहम्’ असे म्हणून या सुरुवातीच्या बिंदुकडे येतो तेव्हा त्याला जीवनाचे सार समजलेले असते.
दिंडी सोहळ्यात एकूण सात रिंगण सोहळे होतात. शरीरातल्या सप्त चक्राची आणि रिंगण सोहळ्याची काही विचारवंतांनी सुरेख गुंफण केली आहे. मूलाधार, स्वाधिष्ठान, माणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा आणि सहस्त्रार ही शरीरातील सप्तचक्र जागृत होत असताना आत्मोन्नतीचा मार्ग साधकाला गवसतो. रिंगण सोहळ्यातही वारकरी आत्मोन्नतीच्या मार्गाला जातो असे मानले जाते. वातावरणात निर्माण होणारा प्रत्येक ध्वनि शरीरात अनेक कंपने उत्पन्न करतो. ध्वनि ही शक्ति आहे हे विज्ञानाने मानले आहे. माऊलींच्या रिंगणात एका तालात, एका सुरात वाजणारे टाळ, मृदंग किती प्रचंड प्रमाणात ऊर्जा निर्माण करतात. ही उत्पन्न होणारी ऊर्जा शरीरातल्या या चक्राना गती देण्याचे काम करते. त्याचबरोबर आत्मोन्नतीच्या मार्गावर बोट धरून चालवते.
पंढरीची वाट | दिंड्या पताका लोळती ||
देवा माज्या विठ्ठलाचं | साधु रिंगानं खेळती ||
पंढरीची वाट | कशानं ग झाली लाल ||
ज्ञानदेव नामदेव | इथं येऊन गेले काल ||
रिंगण सोहळा हा नवविधा भक्तीतील नमन व प्रदक्षिणा या प्रकारचा विधी आहे. वैष्णवांचा स्वाभाविक धर्म नमन आहे. रस्त्यात घडणाऱ्या प्रत्येक रिंगणात जागेवर वारकारऱ्यांसोबत माऊली स्वत: रिंगण खेळते. माऊलीच्या रिंगणाची ठिकाणे ठरलेली आहेत. त्या ठिकाणी प्रशासनातर्फे आधी रिंगणाचा आराखडा आखलेला असतो. रिंगणात माऊली येण्याच्या काही वेळ आधी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले रांगोळी कलाकार माऊलीच्या स्वागतासाठी रांगोळी टाकतात. आपल्या लेखांचे सुलेखनकार डॉ तेजस लोखंडे हेही त्यात अग्रभागी असतात.
नगारखाना दिंडीच्या आगमनाची वर्दी देतो. त्यानंतर दिंडी क्रमांकानुसार आपल्या जागेवर रिंगणात उभ्या रहातात. रिंगणाच्या (उभ्या-गोल) रचनेनुसार दिंडींची रचना असते. रिंगणात उभे वारकरी निरनिराळ्या ‘पाऊली’ (टाळ वाजवत पुढे-मागे होत) खेळत असतात. दिंडीच्या मधल्या मोकळ्या मार्गातून पालखी रिंगणाच्या केंद्रबिंदुकडे जाते. पताकावाले आपल्या झेंड्यांचा स्पर्श माऊलीच्या पालखीला करतात. टाळ, मृदुंगाचा आवाज एका विशेष लयीत चाललेला असतो. संपूर्ण तळावर ‘ज्ञानोबा-तुकाराम’चा गजर टिपेला पोहोचलेला असतो. या आवाजाच्या तालावर आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या बोलावर आजूबाजूचा समस्त समाज आणि निसर्ग डोलत असतो. पालखी आपल्या गतीने केंद्रस्थानी जात असते. केंद्रस्थानी उभारलेल्या मंडपात पालखी विराजमान होते.
रिंगणातले सगळ्यांचे डोळे आता विस्फारलेले असतात. प्रत्येकाला आस असते माऊलीच्या अश्वाला नजरेत समावून घेण्याची, रिंगण सोहळा डोळ्यांच्या कॅमेऱ्यात चित्रित करण्याची. सगळे जण ज्याची आतुरतेने वाट पहाट असतात तो क्षण एकदाचा येतो. चोपदाराच्या अश्वाबरोबर मोठ्या दिमाखात माऊलीचा अश्व रिंगणात प्रवेश करतो. चोपदाराच्या अश्वावर झेंडा असतो, दुसरा सेवक माऊलीच्या अश्वाला पालखीच्या दर्शनास घेऊन जातो. दर्शनानंतर रिंगणाच्या मार्गावर तो सेवक माऊलीच्या अश्वाला थोडे अंतर चालवून चोपदाराच्या घोड्यामागे मोकळा सोडतो. त्यानंतर दोन्ही अश्व रिंगणाच्या मार्गावर गोलाकार धावतात. धावणाऱ्या या अश्वाची धाव मोठी मनमोहक असते. वाऱ्याच्या वेगाशी स्पर्धा करत अश्व प्रदक्षिणा करत असतात. वारकऱ्यांच्या टाळाचे आवाज आसमंतात भरून राहिले असतात. अश्वाच्या पायांच्या खुणा शोधत वारकऱ्यांच्या नजरा भिरभिरत असतात. दोन प्रदक्षिणानंतर रिंगण संपते. या मोकळ्या अश्वावर माऊली स्वार आहे अशी समस्त वारकऱ्यांची समज आहे, म्हणून रिंगणाच्या शेवटी त्याच्या टापा खालची माती गोळा करायला माणसे तुटून पडतात.
रिंगण सोहळा पार पडल्यानंतर सुरू होतात वारकऱ्यांचे विविध खेळ. केंद्रभागी असलेल्या माऊलीच्या पालखीभोवती दिंडीतले टाळकरी, विणेकरी, मृदंगवाले गोलाकार उभे रहातात. भजनाच्या तालावर अखंड दिंडी कधी खाली बसते, तर कधी बसलेली दिंडी उभी रहाते. कधी समोरासमोर तोंड करून उठाबशा काढतात, तर कधी आपले टाळ, मृदंग वाजवत एकमेकांच्या अंगावर एकाच लयीत विसावतात. दोन पावले पुढे दोन पावले मागे असे करताना अचानक मारलेल्या गिरक्या या लयीत किती सुंदर दिसतात. हळूच आवाज कमी करत खर्जाकडे जाताना अचानक नाद वाढवून एक मोठा ठेका वाजतो तेव्हा संपूर्ण समाज जमेल तेवढी ऊंच उडी मारतो. अत्यंत नयनरम्य असे दृश्य असते. पांढऱ्या शुभ्र कपड्यातली ही अदाकारी कोणत्याही कवायतीला लाजवेल अशीच असते. ही अदाकारी कोणत्याही नृत्य शिक्षकाने शिकवलेली नसूनही ती एवढी बिनचूक असते की आपसूक आपले हात तोंडात जातात. या पांढऱ्या शुभ्र पटलावर वारीतल्या रंगीबेरंगी रंगाच्या साड्यातल्या रुखमाई छान नक्षी तयार करतात. भजनाच्या तालावर चालणारे हे खेळ म्हणजे स्वर्ग सुखाचा आनंद असतो. काही काळ खेळ खेळल्यानंतर पालखी आपल्या तळाकडे जाते.
पालखी तळाकडे गेल्यानंतर शिलकीतल्या सर्व वारकऱ्यांना अजून चेव येतो. सर्व स्त्री-पुरुष वारकरी मिळून झिम्मा, फुगडी, लगोऱ्या, हमामा असे अनेक खेळ खेळत असतात. स्त्री-पुरुष, सान-थोर, उच-नीच सगळे भेदभाव गळून पडतात. मन भरेसतोवर सगळेच वारकरी खेळत असतात. मृदंग वाजवणाऱ्याला भलताच चेव आलेला असतो. मृदंगाची लय वाढत असते, खेळ खेळणाऱ्यांची अंगे घामाने निथळू लागतात. मध्येच कृष्ण लीला चालू होतात. थरावर थर रचून मृदंग वरच्या थरावर जातो आणि तिथून आसमंत भरून टाकणारा ठेका पकडतो. त्याला बघून आजूबाजूच्या दिंडीला चेव चढतो ते एकमेकांच्या कमरेला विळखा घालून रश्शीखेच चालू करतात. आपापसात जास्तीत जास्त वेळ फुगडी खेळायची स्पर्धा सुरू होते. कोणी लोटांगणे घालायला लागतो. एक ना अनेक खेळ आपल्याच मस्तीत भजनाच्या ठेक्यावर चालू असतात.
या सगळ्याचे प्रयोजन काय? दिवसभर चालल्यानंतर अशा प्रकारचे श्रम कसे काय झेपतात यांना? याचे उत्तर बहुदा वाजणाऱ्या संगीतात आहे. ध्वनि उर्जेबद्दल आपल्याला शाळेत असल्यापासूनच माहीत आहे. बहुदा भजनातून निर्माण होणारी ही ध्वनि ऊर्जा, या रिंगणात मनसोक्त नाचणाऱ्या ऐशी वर्षांच्या म्हाताऱ्यालाही नवसंजीवनी देते. आणि हा नजारा केवळ येथेच पाहायला मिळतो. खरतर वारकरी परंपरेने रिंगणाचे महत्व अनन्यसाधारण आहे. दिवसभराच्या चालण्याच्या श्रमात शरीरातले काही ठराविक स्नायू वापरले जातात. या रिंगणात होणाऱ्या निरनिराळ्या व्यायामाने शरीरातल्या इतरही स्नायूना चालना मिळते आणि शरीराची सुनियोजनबद्ध हालचाल साध्य होते.
हा संपूर्ण रिंगण सोहळा पाहून जाताना प्रत्येकाच्या तोंडात एकच वाक्य असते. ‘याच साठी केला, अट्टाहास हा’ आणि वारकरी मात्र खुशीत म्हणत असतो
आता कोठे धावे मन, तुझे चरण देखिले आज || धृ ||
भाग गेला शीण गेला, अवघा झाला आनंद || १ ||
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल.)
वारीच्या मार्गावरील आनंदयात्री…दाता असो वा घेता, दोघांनाही समाधान!