मुक्तपीठ टीम
गेली दीड वर्षे कोरोनानं अवघ्या जगाला हादरवलंय. लाखो लोकांना प्राण गमवावे लागले. अतिसुरक्षित राखल्या गेलेल्या जगभरातील मोठ्या व्यक्ती, संस्था यांच्या कार्यालयात, घरातही कोरोनाचा शिरकाव झाला. कडेकोट सुरक्षा असूनही कोरोना तिथंही शिरला, पण आपल्या ठाणे जिल्ह्यातील एक गाव असं आहे, जेथे दोन्ही लाटांमध्ये कोरोनाला शिरकाव करताच आला नाही.
बिवलवाडी गाव वसलंय ते ठाणे आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर…शहापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला. या गावातील सर्वच गावकरी आदिवासी समाजातील आहेत. डोंगरमाथ्यावर उंच वसलेल्या या गावात ७२ घरे असून ४६७ लोकसंख्या आहे.
पाण्याचे दुर्मिक्ष असल्याने तालुक्यावरून टँकरने पाणीपुरवठा केला जातो परंतू पाण्याचे योग्य नियोजन होण्यासाठी प्रत्येकाने स्वखर्चाने पाणी साठवण रेन हार्वेस्टिंग योजना राबविली आहे. शेती हेच मुख्य उदरनिर्वाहाचे साधन असून नाचणी वरईची पीकं घेतली जातात. गाव परिसरात कमालीची स्वच्छता राखली जाते.
आशा सेविका हवसाबाई ठाकरे कोरोनाच्या महामारीपासून आपले संरक्षण आपण स्वतःच कसे करायचे या संदर्भात सतत जनजागृती करत असतात. ग्रामपंचायत सदस्य सुनिता ठाकरेही मोकळेपणाने त्यांचे श्रेय देतात. त्यांनी सांगितले की, कोरोनापासून आपण आपला बचाव कसा करायचा, अगदी शेतावर जाताना सुद्धा तोंडाला मास्क लावून जायचे यासारख्या अनेक गोष्टी आम्हाला आमच्या आशा सेविकांनी समजावून सांगितल्या. आम्ही तसा गावात प्रचार केला. लोकांना पटवून दिले. त्याचा फायदा झाला. आमच्या गावात कोरोना आलाच नाही.
शहापूर तालुक्यातील आमच्या बिवलवाडी गावात आजपर्यंत कोरोनाचा एकही रूग्ण सापडला नाही. त्यामुळे शासन स्तरावर तालुक्यातील कोरोना मुक्त गाव घोषित करण्याची मागणी सह्याद्री आदिवासी म. ठाकूर ठाकर समाज उन्नती मंडळाचे ठाणे जिल्हाध्यक्ष बबन भिमा ठाकरे यांनी केली आहे.
पाहा व्हिडीओ: