मुक्तपीठ टीम
आटपाडीत माणदेशाचे नवे विद्यापीठच स्थापन करा, असा आग्रह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य आटपाडीचे सादिक खाटीक यांनी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या कडे धरला आहे.
शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खानापूर, बस्तवडे, सांगली, तासगांव, आटपाडी यापैकी एका ठिकाणी व्हावे यासाठी सुरु असलेले प्रयत्न, पत्रव्यवहार, आंदोलने, वक्तव्ये या पार्श्वभूमीवर सादिक खाटीक यांनी ईमेलवरून आटपाडीत नवे विद्यापीठच व्हावे या मागणी कडे मंत्री महोदयांचे लक्ष वेधले आहे.
स्वातंत्रपूर्व काळापासून आटपाडीचे सर्वच क्षेत्रात महत्व अधोरेखित केले गेले आहे. स्वातंत्र्या आधीच आपल्या संस्थानमध्ये लोकशाही आणणारे राजे भवानराव उर्फ बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी शिक्षण, व्यायाम, आरोग्य, सांस्कृतीक उद्योग क्षेत्रा बरोबर अन्य क्षेत्रातही मोठे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. संस्थानचा मुख्य महाल असलेल्या आटपाडी मध्ये उच्च शिक्षणासाठी भवानी विद्यालय, मोठ्या शिक्षेच्या गुन्हेगारांवर संस्कारातून परत माणसात आणणारी, दो आँखे बारह हाथ या जगविख्यात चित्रपटाचा निर्मिती स्त्रोत असणारी, स्वतंत्रपुर ची कैद्याची खुली वसाहत, स्वतंत्र नगरपालीका वगैरे उपक्रमातून आटपाडीला स्वातंत्रापूर्वीच मोठी ओळख आणि उंची मिळवून देण्याचे काम केले गेले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू पद भुषविणारे शंकरराव खरात हे आटपाडीचेच असून त्यांच्यासह थोर साहित्यिक ग. दि. माडगुळकर, व्यंकटेश तात्या माडगुळकर, ना. सं. इनामदार आणि बाळासाहेब पंत प्रतिनिधी या आटपाडी शी संबंध असणाऱ्यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे. एकाच तालुक्यातले पाच अध्यक्ष देणारा आटपाडी हा तालुका राज्यात एकमेव असू शकतो.
राज्य, राष्ट्रीय स्तरावर गाजलेले माजी मंत्री राम नाईक,साहित्यीक अरुण कांबळे, शांताबाई कांबळे (करगणी) अॅड.नानासाहेब झोडगे (माडगुळे), प्रकाश देशपांडे चिपळूण (वलवण), सुभाष कवडे भिलवडी (आटपाडी), प्राचार्य डॉ.सयाजीराजे मोकाशी (शेटफळे), कै. शाहीर जयंतराव जाधव (आटपाडी), प्रा.सुरेश देशपांडे पुणे (आटपाडी), प्रा . विश्वनाथ जाधव, प्रा. साहेबराव चवरे झरे, रमेश जावीर, रविकिरण जावीर, अनिशा जावीर खरसुंडी, प्रा. बालाजी वाघमोडे, विजय देवकर शेटफळे, लताताई बोराडे, सौ स्मिता शिंदे – साळुंखे, आवळाई, मेघा पाटील, भारती पाटील, सुखदेव नवले आटपाडी, रविकुमार मगदुम विटा (निंबवडे), हरीभाऊ गळवे गळवेवाडी, संभाजीराव गायकवाड शेटफळे, विश्वास जावीर पिंपरी खुर्द, सुधीर इनामदार, साहेबराव कदम गोमेवाडी, राज्य राष्ट्रीय स्तरावर गाजलेले गणेश राक्षे, शाम राक्षे, चित्रपट दिग्दर्शक म.गो. तथा बाबा पाठक, एबीपी माझा मराठी न्यूज चॅनेलचे संपादक राजीव खाडेकर, प्रा.अंबादास माडगुळकर, शामकाका माडगूळकर, बाबाखान दरवेशी (करगणी), लावणीसम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपुरकर (बनपुरी), आटपाडी तालुक्याचे शिल्पकार कै. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार कै. आण्णासाहेब लेंगरे, जतचे माजी आमदार अॅड. दिवंगत जयंत सोहनी (गोमेवाडी), महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा आटपाडीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार राजेंदआण्णा देशमुख, परिषदेच्या आटपाडी शाखेचे विद्यमान अध्यक्ष माजी जि.प. अध्यक्ष अमरसिंहबापु देशमुख, गदिमा साहित्य सेवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेबकाका पाटील, औंध संस्थानचे मंत्री कै. रस्तुमरावबापू सेना सुभे चव्हाण देशमुख, संस्थानचे माजी मंत्री अमिनुदीन कुरेशी, संस्थानचे माजी आमदार मिठुलाल कलाल, कलाप्रेमी कवी मनाचे शिक्षक नवसरलाल कलाल, स्वतंत्रपूरचे पहिले जेलर अब्दूल अजिज काझी मास्तर, शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे ह. ग. देशमुख, रंगलाल कलाल, भा. दि. माडगूळकर, आकाशवाणीवर गाजलेले कृष्णराव सपाटे, जागतिक किर्तीचे मल्ल वस्ताद पैलवान नामदेव बडरे, बार्डो चित्रपटाचे दिग्दर्शक भिमराव मुढे, शास्त्रज्ञ डॉ. दीपक पिंजारी, इत्यादी अनेक आटपाडी तालुक्याशी संबध असलेल्यांनी माणदेशी आटपाडीचे नाव अजरामर केले आहे.
माणदेशाचाच भाग असलेल्या जत, कवठेमहंकाळ, सांगोला, मंगळवेढा, माण, खटाव, खानापूर या तालुक्यातील साहित्यीक, प्रज्ञावंत, गुणवंत यांची ही संख्या मोठी आहे. आटपाडी तालुक्यात वेगवेगळ्या शिक्षण संस्थाच्या माध्यमातून किमान ५० हायस्कुल – विद्यालय, अनेक महाविद्यालये कार्यरत आहेत. येथील शिक्षण संस्थाचे कार्यक्षेत्र सोलापूर, सातारा जिल्हयातही आहे. सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवरील या माणदेशी ८ तालुक्यात सुमारे ४०० हायस्कुल १०० महादिद्यालये व शिक्षणाची अन्य दालने या नव्या विद्यापीठाचा भाग बनतील.
भारती विद्यापीठाचे संस्थापक डॉ. पतंगराव कदम यांनी भारती विद्यापीठाची स्थापना पुण्यातल्या एका लहानशा जागेत करून त्यास जगविख्यात स्वरूप मिळवून दिले. डॉ. पतंगराव कदम यांनी सामान्य स्थितीत घेतलेली झेप, गरुडभरारी ठरू शकते तर शिक्षणा व्यवस्येचा मोठा भक्कम पाया असणाऱ्या आटपाडी तालुक्यात नवे विद्यापीठ साकारणे मोठे अडचणीचे ठरेल असे वाटत नाही.
निर्मितीच्या पंचाहत्तरीत संपूर्ण सांगली जिल्हा सर्वच क्षेत्रात देशात अव्वल असला पाहीजे हे मंत्री जयंतराव पाटील यांचे मोठे व्हीजन आहे, आणि या व्हीजन मध्ये माणदेशातले आटपाडी ,खानापूर ,जत, कवठेमहंकाळ तालुक्यांचा समावेश आहे. कृष्णामाईच्या पाण्याने सर्वत्र समृद्धता येवू लागलीच आहे. त्या पार्श्वभूमीवर आटपाडीतल्या नव विद्यापीठाने आटपाडीतून रेल्वे वाहतूकीचे, आटपाडी मुख्यालय असलेल्या माणदेश जिल्ह्याचे आणि गलाई व विविध व्यवसायाने संपूर्ण देशभर , अगदी शेजारच्या देशात असणाऱ्या हजारो माणदेशींच्या वाहतूकीसाठी, एक्स्पोर्ट दर्जाचा भाजीपाला ,फळफळावळ, दुध अंडी, मांस व इतर उत्पादनांच्या तातडीच्या वाहतूकीसाठी आवश्यक ठरणाऱ्या आटपाडीतून विमान वाहतूकीच्या सेवेचे दार ही उलघडू शकणार आहे. अशा स्वप्नांना साकरण्यासाठी आपल्या सारखा दुरदृष्टीचा, मोठे व्हीजन असणारा नेताच न्याय देवू शकतो. सातारा – सांगली जिल्ह्याच्या एकत्रित लोकल बोर्डाच्या उपाध्यक्षपदी आटपाडी च्या नेतृत्वाला ६७ वर्षापूर्वी संधी देणारे जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष, आपले परमपुज्य पिताश्री राजारामबापू पाटील यांनी आटपाडी तालुक्याला प्रथम प्राधान्याने झुकते माप दिल्याचा इतिहास आहे आणि आपल्या ही अंतःकरणात आटपाडी तालुक्याला अनन्य साधारण स्थान आहे. माणदेशाच्या मुख्यालय आटपाडीत नवे विद्यापीठ साकारणे हे आपल्या व्हीजनचाच एक भाग ठरू दयात असाही आर्जव सादिक खाटीक यांनी या इमेल मध्ये व्यक्त केला आहे.