डॉ. नरेंद्र भिकाजी कदम
डॉ. तेजस वसंत लोखंडे
पाऊस पडून गेला, पेरण्या उरकल्या की शेतकऱ्याला पंढरीचे वेध लागतात. भुरू भुरू पडणारा पाऊस पिकाला अनुरायला मदत करत असतो. शेतीची इतर वरकड कामे संपलेली असतात. पडणाऱ्या पावसाने खुडुक कोंबडीसारखे घरात काय बसायचे? चार लोकासंग नाम संकीर्तनात वेळ सत्कारणी लागेल म्हणून पेरणी वेळेत आटोपून बळीराजाची पावले पंढरीकडे वळतात.
पाऊले चालती पंढरीची वाट
सुखी संसाराची जोडूनिया वाट
ईश्वराच्या प्रति आपले सर्वस्व वाहिलेला वारकरी दरसाल न चुकता वारी करतो. वारितून मिळणाऱ्या अनोख्या समाधानाने त्याचे संसाराचे सुख द्विगुणित होते. विठ्ठल भक्ति अन संसाराची अनोखी वीण विणली जात असताना मिळणारे आत्मिक समाधान प्रपंचाच्या विवंचनांचा विसर पाडतात.
फुकटात काही पुण्य पदरात पाडून घेता येत असेल तर कोणालाही हवेच असते. ‘पालखी सोहळा’ ही तर अशा लोकांना पर्वणीच असते. जमेल त्या परीने वारकऱ्यांची सेवा करण्यात धन्यता मानणारा हा वर्ग, अनेक प्रकारे सोहळ्याला मदत करत असतो. दिंडीत चालणारा हा वारकरी अनेक असुविधांचा सामना करत आपुल्या परीने त्यावर मात करायचा प्रयत्न करत असतो. तरीही सुयोग्य वैद्यकीय सेवा हा कळीचा मुद्दा उरतोच. निव्वळ आरोग्य विभागाच्या जिवावर एवढ्या मोठ्या जनसमुदायाची जबाबदारी लादणे अमानुषतेचे लक्षण होईल. म्हणून आपल्या परीने या असुविधेचा सामाना करण्यासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत.
या सेवाभावी संस्थापैकी पालखी सोहळ्याच्या व वारकऱ्यांच्या मनात कोरलेली ‘वैष्णव चॅरिटेबल आणि मेडिकल ट्रस्ट’ गेले अठ्ठावीस वर्षे विनामूल्य आरोग्य सेवा देणारी संस्था आहे. या संस्थेच्या ऋणानुबंधाने असेच फुकटचे पुण्य पदरात पाडून घेण्याचे सौख्य अस्मादिकांना गेले चोवीस वर्षे लाभले आहे. डॉ तेजस लोखंडे हे ही या सेवेत बारा वर्षे योगदान देत आहेत.
कोरोनाच्या भयानक राक्षसाने गेले दोन वर्षे वारीच्या या सौख्यसोहळ्याला गालबोट लावले आहे. बंदिस्त येस्टीतून मोजक्या वारकऱ्यांच्या सोबत माऊलीच्या पादुका विठ्ठला भेटीला जात आहेत. माऊलीची अन विठ्ठलाची भेट झाली तरी रुग्णसेवेतून आम्हाला भेटणारी माऊली हरवली आहे.
प्रस्थानाचा दिवस जवळ येताच आपसूक मनातून सेवेची उर्मी जागृत होते. गेले वर्षी गाथेतल्या काही अभंगाना जनसामान्यांपर्यंत पोहोचवून ही उर्मी जिवीत ठेवली होती. या वर्षी वैष्णवच्या आम्हा दोघांच्या कारकिर्दीत आम्हाला भावलेली ही वारी, जनसामान्यांच्या नजरेने कशी दिसते ते तुम्हापर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न. वारीचा आनंद तुम्हाला ही मिळाला की आमची सेवा सुफळ झाली असे म्हणता येईल.
(लेखक डॉ. नरेंद्र भिकाजी कदम, BAMS, PGDHHAM, MBA, LLb. लेखनाची रुची आहे. सिक्सटीन डेज ऑन व्हील्स हे लदाखचे प्रवासवर्णन प्रकाशित झाले आहे. चाळ-वा-चाळ-व ही चाळ संस्कृतीची ओळख करून देणारी लेखमाला पुण्याच्या प्रभातमध्ये रुपगंध पुरवणीत प्रकाशित होते आहे.
त्यांच्या लेखनाला सुलेखनाची जोड दिली आहे ती डॉ. तेजस वसंत लोखंडे, BAMS, आयुर्वेद चिकित्सक यांनी. हा माणूस म्हणजे सुलेखन, रांगोळी, गड संवर्धन या गोष्टींसाठी सतत प्रयत्नशील असलेला अवलिया असंच म्हणावं लागेल. )