मुक्तपीठ टीम
राज्यातील अनेक जिल्हे आणि शहरांमध्ये आज लसीकरण बंद आहे. काही ठिकाणी आज लसीकरण सुरु असले तरी तेथेही एक किंवा दोन दिवस पुरेल एवढाच लससाठा आहे. रत्नागिरीसारख्या जिल्ह्यात तर एकही डोस शिल्लक नाही. यामुळे नागरिकांमधील संताप माध्यमांमध्ये दिसत आहे. त्याचे खापर स्थानिक प्रशासनावर फोडले जात असले तरी मुळात लस पुरवठा करण्याची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने घेतली असल्यामुळे आम्हाला दोष देता, असा सवाल स्थानिक अधिकाऱ्यांकडून विचारला जात आहे. त्यातच नागरिकांमध्ये लसीकरणाविषयी जागरूकता वाढत असल्यानं स्वत:हून वळणाऱ्या लोकांची संख्या वाढत आहे. त्याचवेळी जुलैमध्ये दिवसाला एक कोटी लसींचे डोस पुरवले जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जूनच्या अखेरच्या आठवड्यात असलेली लस टंचाई जुलै महिन्यात अधिकच वाढण्याची भीती आहे.
जुलै ते ऑगस्ट दरम्यान दररोज सुमारे १ कोटी लस देऊन या वर्षाच्या अखेरीस देशातील प्रौढ लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे केंद्र सरकारने म्हटले होते. मात्र, एका दिवसात एक कोटी लस देण्याचे उद्दिष्ट जुलै महिन्यातदेखील पूर्ण होताना दिसत नाही आहे. जुलैमध्ये केंद्र सरकार राज्य व केंद्रशासित प्रदेशांना कोरोना लसीचे १२ कोटी डोस देईल. यापैकी १० कोटी डोस कोविशिल्डचे असतील, तर २ कोटी डोस कोवॅक्सिनचे असतील.
लस पुरणार कशी?
• जुलै महिन्यात देशभरात १२ कोटी लसींचे डोस मिळणार
• लसीच्या १२ कोटी डोसपैकी ७५ टक्के केंद्राद्वारे राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दिली जातील.
• नवीन लस धोरणांतर्गत २५ टक्के ही लस खासगी रुग्णालयांची असेल.
• याचा अर्थ देशभरातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना ९ कोटी डोस मिळतील. प्रत्यक्षात दिवसाला एक कोटीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी २२ कोटी ५० लाख डोस आवश्यक होते.
• त्यानुळे पुढील महिन्यात लसीकरणाची गती कमी होऊ शकते.
• १२ कोटी लसींनुसार देशात दररोज सरासरी फक्त ४० लाख डोस दिले जातील.
राज्यभरात तीव्र लस टंचाई
• मुंबईत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रांवर लोकांची गर्दी दिसत आहे. मात्र, काही वेळातच लस साठी संपल्याचे सांगून लोकांना परत पाठवले जात आहे.
• औरंगाबादेत तिसऱ्या दिवशीसुद्धा लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी, त्या प्रमाणात लस उपलब्ध आहेत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
• चंद्रपूर जिल्ह्यात आज १२ केंद्रांवर लसीकरण सुरु, मात्र, केवळ दोन दिवस पुरेल इतकीच लस उपलब्ध आहे.
• पालघरमध्ये दोन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा आहे.
• रत्नागिरी जिल्ह्यात आज कुठेच कोरोना लसीकरण होणार नाही. जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून एकही डोस उपलब्ध नाही.
• अशाच तक्रारी राज्यभरातून येत आहेत.
‘मुक्तपीठ’च्या सूचना
• केंद्राने दिलेल्या माहितीनुसारच नियोजन करून लसीकरण आवश्यक
• केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना येत्या महिन्यात किती डोसची लसी देणार आहेत याची अगोदर माहिती दिली आहे, जेणेकरून त्यानुसार लसीकरण करता येईल.
• राज्य सरकार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या केंद्रांच्या बाहेर तसे फलक लावावेत आणि नागरिकांना माहिती पुरवावी.
• सध्या नागरिक स्वत:हून लसीकरणासाठी जाऊ लागले आहेत, पण त्यांना लसीकरणासाठी जो त्रास होतो, त्यामुळे ते हिरमुसले होतात. परतलेल्यांपैकी किती पुन्हा परततील, त्याबद्दल शंकाच आहे.
• कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींच्या माध्यमातून सध्या केंद्र सरकार देशात लसीकरण राबवित आहे. या व्यतिरिक्त रशियाची स्पुतनिक व्हीलाही मान्यता देण्यात आली होती आणि आता ती काही खासगी रुग्णालयात उपलब्ध आहे.