मुक्तपीठ टीम
ग्रामपंचायती म्हणजे राजकारणाचे केजी वर्ग. प्रथमच या केजी वर्गाच्या निवडणुकीला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. गावागावातील राजकारणाचा कल स्पष्ट करणाऱ्या या निवडणुकांच्या ग्रामयुद्धामध्ये अनेक गावांमधील मतदारांनी प्रस्थापित नेत्यांना मोठा धक्का दिला आहे. वर्षानुवर्षेच नाही तर दशकानुदशकेही असलेली काही गावांमधील मोठ्या नेत्यांची सत्ता मतदारांनी उलथून लावली आहे. आणि त्यांच्या विरोधात कौल दिला आहे. यात सर्वात मोठे नाव भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आहे. त्यांच्या गावात शिवसेनेने भगवा फडकवला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावात शिवसेनेने विजयी मुसंडी मारली आहे. हा मोठा धक्का मानला जातो आहे. त्यांनी सर्व प्रयत्न करुनही कमळ कोमेजलेले आहे.
भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या मतदारसंघातील चार ग्रामपंचायतीत भाजपचा पराभव झाला आहे. तर शिवसेना आणि राष्ट्रवादीचा विजय मिळाला आहे.
राधाकृष्ण विखे-पाटलांना त्यांच्या गावातच धक्का बसला आहे. त्यांच्या पॅनलचा प्रथमच धुव्वा उडाला आहे. असाच धक्का पृथ्वीराज चव्हाणांना कराडात बसला आहे. तिथे भाजपच्या अतुल भोसले यांनी अनेक गावांमध्ये कमळ फुलवले आहे. सोलापूरच्या माळशिरसमध्ये विजय सिंह मोहिते पाटील आणि धवलसिंह मोहिते पाटील यांच्यात चुरस सुरु आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नारायण राणेंच्या बळावर भाजपने शिवसेनेसमोर तगडे आव्हान उभे केले आहे. अनेक ठिकाणी शिवसेनेला धक्का बसला आहे. सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये कमालीची चुरस आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार दोन्ही पक्षांना समसमान वाटा मिळेल असे दिसत आहे.
सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ग्रामपंचायतीत माजी सभापती राजू परब यांचा करिष्मा चालला आहे. सात जागांवर विजय मिळवत भाजपाने सत्ता मिळवली आहे.
भाजप आमदार नितेश राणेंच्या मतदारसंघातील ग्रामपंचायत त्यांच्याकडून शिवसेनेने खेचून घेतली आहे. तर राजापुरातील ग्रामपंचायतीत शिवसेनेला धक्का बसला आहे.
साताऱ्यातील पाटणमध्ये शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी भगवा फडकवला असून तिथे राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाला फटका बसला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या सासुरवाडीचे गाव असणाऱ्या सांगलीतील म्हैसाळ गावात राष्ट्रवादीचे घड्याळ चालले नाही. पाटील यांचे मेव्हणे राऊळे उभे असलेल्या पॅनलचा धुव्वा उडवत भाजपनं बाजी मारली आहे.