मुक्तपीठ टीम
भारताचे स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत २०२२ वर्षाच्या सुरुवातीला तयार होईल अशी शक्यता आहे. पुढच्या काही महिन्यांत विक्रांतच्या समुद्री चाचण्या सुरू होणार आहेत. कोची शिपयार्ड आणि भारतीय नौदलाच्या उच्च अधिकाऱ्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना या संदर्भात सविस्तर माहिती दिली.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाच्या कोची आणि कोची शिपयार्ड येथील दक्षिणी कमान येथे दोन दिवसांच्या भेटीत स्वदेशी विमान वाहक युद्धनौका विक्रांतच्या बांधकाम कामाचा आढावा घेतला. या वेळी त्यांच्यासमवेत नौदलाचे प्रमुख अॅडमिरल करमबीर सिंह आणि दक्षिणी कमानचे कमांडर, व्हाइस अॅडमिरल ए.के. चावला उपस्थित होते.
Raksha Mantri Shri @rajnathsingh will review the progress of construction of the Indigenous Aircraft Carrier (IAC) in Kochi today. pic.twitter.com/mbQs0CorZj
— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) June 25, 2021
आयएनएस विक्रांत समुद्रातील प्रभावी शस्त्र
• जेव्हा आयएनएस विक्रांत पूर्णपणे तयार होईल, तेव्हा ते नौसेनेचे समुद्रातील सर्वात प्रभावी आणि घातक शस्त्र असल्याचे सिद्ध होईल.
• मिग-२९के लढाऊ विमान
• कामोव हेलिकॉप्टर
• अॅन्टी-सबमरीन हेलिकॉप्टर
• एमएच-६०आर
• स्वदेशी अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर्स विक्रांतवर तैनात असतील.
आयएनएस विक्रांत लांब पल्ल्यातील हवाई कामगिरीसाठीही उपयोगी ठरेल. ज्यामध्ये एअर इंटरडिक्शन, अॅन्टी-सर्फेस वॉरफेअर, आक्रमक आणि बचावात्मक काउंटर-एअर, एअरबोर्न अॅन्टी-सबमरीन वॉरफेअर आणि एअरबोर्न अर्ली वॉर्निंगचा समावेश आहे. संरक्षणमंत्री म्हणाले की, “गेल्या वर्षी एलएसीवर चीनबरोबर झालेल्या गॅलवान व्हॅली हिंसाचाराच्या वेळी, भारतीय नौदलाने स्पष्टपणे सांगितले होते की, भारताला शांतता हवी आहे, परंतु तरीही कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास भारत तयार आहे.”
संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितले की, येत्या काळात भारतीय नौदल जगातील तिसऱ्या क्रमांकाची नौदल बनेल. सध्या भारतीय नौदलाच्या ४२ युद्धनौका वेगवेगळ्या शिपयार्डमध्ये तयार होत आहेत, त्यापैकी ४० युद्धनौका भारतातच बांधल्या जात आहेत.