मुक्तपीठ टीम
भातही खा…मनमुराद खा आणि वजनही घटवा. पुन्हा तुमची भूक जरा जास्तच वाढवण्यासाठी या भाताला रंगही असणार. नाही बिर्याणीत देतात तसा कृत्रिम नाही तर भाताचाच स्वत:चा नैसर्गिक असा. महाराष्ट्रात लाल आणि हिरव्या भाताची लागवड महाबळेश्वरमध्ये करण्यात आली आहे. तेथे यापूर्वी निळा भात व केशराचा अभिनव उपक्रम महाबळेश्वरमध्ये करण्यात आला होता त्याला कृषी विभागाला यश देखील प्राप्त झाले होते. आता महाबळेश्वर कृषी विभागाने लाल आणि हिरव्या भाताची लागवड नुकतीच केली आहे.
सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील बिरवाडीमध्ये कृषि विभागामार्फत पौष्टिक अशा हिरव्या व लाल भाताची लागवड करण्यात आली आहे. बिरवाडी येथील शेतकरी समीर चव्हाण यांच्या शेतात एस.आर.टी म्हणजेच सगुणा भात तंत्रज्ञान या पद्धतीने गादी वाफ्यावर करण्यात आली आहे.
भात हे अनेकांचे मुख्य अन्न आहे. भात म्हटले की फक्त पांढरा रंग आठवतो. परंतु मागील आठवड्यातच महाबळेश्वर तालुक्यात निळ्या भाताची लागवड करण्यात आली होती. याचबरोबर आता हिरवा व लाल भाताचीही लागवड करण्यात आली आहे. ही लागवड करीत असताना शेतकरी वर्गाला कृषि विभागाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी सातारा कृषी उपसंचालक विजय राऊत, वाई उपविभागीय कृषी अधिकारी चंद्रकांत गोरड, सातारा तंत्र अधिकारी महामुलकर, कृषी अधिकारी राजेंद्र देशपांडे, मंडळ कृषी अधिकारी बुधावले, कृषी सहाय्यक दिपक बोर्डे, विशाल सुर्यवंशी, शेतकरी समीर चव्हाण उपस्थित होते.
हिरव्या भाताची वैशिष्ट्ये
- भातामध्ये ९६ टक्के फायबर,फॅट फ्री भात तसेच
- ॲंटीऑक्सीडेंटस, न्युट्रीयन्टस व व्हीटामिन्स विपूल प्रमाणात आढळतात.
लाल भाताची वैशिष्ट्ये
- या भातामध्ये फायबर,आर्यन ,मॅंगेनीजचे प्रमाण जास्त आहे.
- मुबलक प्रमाणातील आर्यन व व्हीटॅमिन्स मुळे रक्तातील लाल पेशींची संख्खा वाढण्यास मदत होते.
- या भातामध्ये ब्राऊन भातापेक्षा १० पट जास्त ॲंटीऑक्सिटेंडचे प्रमाण आहे.
- ११० दिवसाचे लाल भाताचे वाण असून यामध्ये ॲन्योसायनीनचे प्रमाण अत्यंत कमी आहे.
- त्यामुळे वजन कमी करण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो
हिरव्या भाताची वैशिष्ट्ये
- ग्रीन राईसबद्दल कृषि सहाय्यक दीपक बोर्डे यांनी माहिती दिली.
- महाराष्ट्रामध्ये प्रथमच हिरव्या भाताची लागवड होत आहे.
- ‘तिलकस्तुरी’ हे हिरव्या भाताचे वाण असुन ते १४० दिवसांमध्ये तयार होते.
- या भात पिकाची वाढ १२५ सेंमी पर्यंत होते.
- वनस्पतींच्या पानांमध्ये असणाऱ्या हरितद्रव्य मुळे पानांना हिरवा रंग प्राप्त होतो.
- हेच पानांमध्ये असणारे हरितद्रव्य भातांच्या दाण्यांमध्ये आढळते.
- त्यामुळे भाताचे दाणे हिरवे दिसतात.
- त्यामुळे याला हिरवा भात किंवा ग्रीन राईस म्हटले जाते.