मुक्तपीठ टीम
भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लोटेने हाहाकार माजवला होता. त्यामुळे भारताचा अनेक देशांशी असलेल्या विमान सेवा स्थगित करण्यात आल्या होत्या. आता भारतात कोरोनाचा वेग मंदावत असल्यामुळे पुन्हा काही मार्गांवरील विमान सेवा पूर्ववत सुरु होत आहेत. एमिराट एअरलाईनने २३ जूनपासून भारतासह दक्षिण आफ्रिका आणि नायजेरियातील शहरांशी जोडणारी उड्डाणे पुन्हा सुरू करणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, या प्रवासासाठी काही महत्वाचे नियम दुबई प्रशासनाने जाहीर केले आहेत. त्यांची पूर्ती केलेल्यांनाच प्रवासाला परवानगी मिळणार आहे.
दुबईच्या मान्यतेने उड्डाण सुरु
- दक्षिण आफ्रिका, नायजेरिया आणि भारतहून दुबई आणि त्यापलीकडे प्रवास सुरळीतपणे सुरू व्हावा, याकरिता एमिराट एअरलाईन्सचे प्रयत्न आहेत.
- दुबईतील संकट व आपत्ती व्यवस्थापनविषयक सर्वोच्च समितीने जाहीर केलेली सुरक्षा नियमावली आणि उपायांचे एमिराट एअरलाईन्सने स्वागत केले आहे.
- प्रवासादरम्यान कोरोना सुरक्षा नियमांचे पालन करण्यावर खास लक्ष दिले जाईल.
प्रवासासाठी कोण पात्र?
- दुबईतील संकट आणि आपत्ती व्यवस्थापन विषयक सर्वोच्च समितीने दुबई प्रवासासाठी नियमावली जाहीर केली.
- सध्या ज्यांना दुबईला यायचे आहे त्यांच्याकडे दुबईचा वैध निवासी व्हिसा असणे आवश्यक आहे.
- अशा वैध निवासी व्हिसाधारक भारतातील प्रवाशांनी संयुक्त अरब अमिरातीने मान्यताप्राप्त दर्जा दिलेल्या कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असणे आवश्यक आहे.
- ज्यांनी मान्यताप्राप्त लसीचे दोन्ही डोस घेतले असतील त्यांनाच दुबईला येण्याची परवानगी देण्यात येईल.
- त्यांना प्रवासाच्या ४८ तास आधी केलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्टही दाखवावा लागेल.
या नियमांनुसार २३ जूनपासून दक्षिण आफ्रिका, नायजेरिया आणि भारतील विमान सेवा एमिराट पुन्हा सुरू करणार आहे. एमिराट एअरलाईन्सने ६ जुलै २०२० पासून भारतातील विमान सेवा बंद केली होती. युएई नागरिक, युएई गोल्डन व्हिसा धारक सदस्यांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.