मुक्तपीठ टीम
देशातील बदलती राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन भाजपाने आगामी उत्तर प्रदेश आणि २०२४ची लोकसभा अशा दोन निवडणुका लक्षात घेऊन काम सुरु केले आहे. त्यासाठीच अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माण कार्यास गती देण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जवळचे मानले जाणारे आणि राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष असलेले नृपेंद्र मिश्रा अयोध्येत पोहचले असून ते खास प्रयत्न करणार आहेत.
उत्तर प्रदेशात कोरोना महासंकटात भाजपासाठी राजकीय महासंकट तयार झाल्याचे मानले जाते. त्यामुळे त्या राज्यासाठी सर्वात महत्वाचा असलेल्या राम मंदिराच्या भावनात्मक मुद्द्यावर भाजपाने केवळ भूमिपूजनच केले नाही तर निर्माण कार्यालाही गती दिली हे दाखवण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. त्यासाठीच किमान लोकांना दाखवता यावं एवढं तरी काम २०२२ला उत्तर प्रदेशातील हिंदू मतदारांसमोर मांडता यावं असा प्रयत्न असेल.
कोरोना महासंकटाचा फटका भाजपाला केंद्रीय पातळीवरही बसला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वार सात वर्षात प्रथमच कडवट टीकेला सामोरे जावे लागले. प्रादेशिक नेतृत्व त्यांच्यापेक्षा लोकप्रियतेत पुढे असल्याचे प्रथमच दिसून आले. त्यातूनच मग मंत्रिमंडळ फेरबदलाचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर २०२४मध्ये मतदारांना सामोरे जाताना आम्ही करून दाखवलं असा दावा करण्यासाठी एखादा मुद्दा साथीला असावा, असा प्रयत्न आहे. त्यासाठीच २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम पूर्ण करून मंदिर प्रवेशाचा अतिभव्य सोहळा साजरा करण्याचा अजेंडा ठरवण्यात आला असावा.
यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू नोकरशहा आणि राम मंदिर बांधकाम समितीचे अध्यक्ष असलेले नृपेंद्र मिश्रा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ते आज अयोध्येत पोहोचले आहेत. अयोध्येत राम मंदिर बांधण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. दोन दिवस चालणार्या या बैठकीत मंदिराच्या बांधकामाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर निर्णय घेण्यात येणार आहेत.
अयोध्येतील श्री राम मंदिर निर्मितीला वेग देणार
• नृपेंद्र मिश्रा हे रामजन्मभूमी संकुलातील पायाभूत बांधकाम स्थळाची पाहणी देखील करतील.
• २०२४ पूर्वी राम मंदिर पूर्ण होईल, असा समितीचा दावा आहे.
• पुढील लोकसभा निवडणुकीतही राम मंदिराचा मुद्दा असणार हे स्पष्ट आहे.
• एल अँड टी, टाटा कन्सल्टन्सी या बांधकाम कंपनीचे अधिकारीही ट्रस्टच्या सदस्यांसह या बैठकीला उपस्थित राहतील.
• बैठकीत मंदिराच्या भिंतीवर कोणते दगड वापरले जातील यावरही निर्णय घेण्यात येईल.
• ट्रस्टचे कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी यांच्यासह अन्य विश्वस्त आणि वास्तुविशारद आशिष सोमपुरा हेही या बैठकीस उपस्थित राहतील.
• राम जन्मभूमी संकुल आणि पूर्वी स्थापित झालेल्या कार्यशाळेचीही पाहणी केली जाईल.