मुक्तपीठ टीम
मुंबईसाठी रविवार १३ जून आणि सोमवार १४ जून हे दोन दिवस धोक्याचे आहेत. हवामान खात्यानं हे दोन दिवस मुंबईत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे आवश्यक काम नसेल तर मुंबईकरांनी घराबाहेर जाऊ, नये असा सल्ला देण्यात आला आहे. तेवढंच नाही तर मनपाच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याने समुद्र किनारे व लगतचा परिसर इत्यादी ठिकाणी जाणे नागरिकांनी टाळावे, असे आवाहन केले आहे. मुंबई मनपाने अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन कमालीचे प्रयत्न केले आहेत.
मुंबई मनपाची यंत्रणा सज्ज
• विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना अतिदक्ष राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.
• मुंबई मनपाची सर्व यंत्रणा सुसज्ज व सतर्क आहेत.
• मुंबई मनपाचे सर्व विभागीय नियंत्रण कक्ष आवश्यक मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सज्ज आहेत.
• पर्जन्य जलवाहिन्या विभागाची ६ उदंचन केंद्रे व विविध ठिकाणी बसवण्यात आलेले पाण्याचा उपसा करणारे उदंचन पंप कार्यरत असल्याची तपासणी करण्यात आली आहे.
• या सर्व संचांमधील पंपसाठी आवश्यक त्या डिझेलची व्यवस्थादेखील स्थानिक उदंचन संच चालकांद्वारे करण्यात आली आहे.
आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता
• मुंबई अग्निशमन दलाची पूर व बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामुग्रीसह ६ प्रादेशिक केंद्रांवर सज्ज आहेत.
• राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक म्हणजेच एनडीआरएफ आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदत आणि बचाव मोहिमेसाठी सज्ज आहे.
• भारतीय तटरक्षक दल, नौसेना समन्वयक अधिकाऱ्यांना कुलाबा वेधशाळेचा अंदाज कळवण्यात आला आहे. तेही आवश्यकता निर्माण झाल्यास मदतीकरता सज्ज आहेत.
• बेस्ट, टाटा पॉवर आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन अति दक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
• वीज कंपन्यांची पथके वीज पुरवठ्याच्यासंदर्भातील कोणत्याही आणीबाणी त्यांची मदत पथके सुसज्ज व सतर्क आहेत.
बचावापासून आश्रयापर्यंत सर्व तयारी
• मुख्य आपत्कालीन नियंत्रण कक्ष व बॅकअप नियंत्रण कक्ष येथे पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व सज्ज आहे.
• आणीबाणी मदत यंत्रणांपैकी पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलिस, बेस्ट, शिक्षण खाते, आरोग्य खाते, परिवहन आयुक्त यांचे समन्वयक अधिकारी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित असणार आहेत.
• मिठी नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे निदर्शनास आल्यास क्रांतीनगर व इतर परिसरातील नागरिकांच्या तात्पुरत्या स्थलांतराची व्यवस्था करण्याच्या सूचना सहाय्यक आयुक्त, एल विभाग यांना देण्यात आल्या आहेत.
• मिठी परिसरात त्वरित मदतीकरता राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकाची एक तुकडी तेथेच तैनात करण्यात आली आहे.
• मुंबई मनपाच्या २४ विभागांमधील काही मनपा शाळा या तात्पुरते निवारे म्हणून निश्चित करण्यात आल्या आहेत, परिस्थिती उद्भवल्यास त्या शाळा त्वरित निवारा आणि अन्य सुविधेसाठी सुसज्ज आहेत.