मुक्तपीठ टीम
उत्तर प्रदेशात पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आतापासूनच मोर्चेबांधणी सुरु केली आहे. मात्र कोरोनाच्या या संकटकाळात योगी उत्तर प्रदेशमधली वैद्यकीय सेवा हाताळण्यात अपयशी ठरल्याचं चित्र दिसत आहे. गंगेतिरी सापडलेले मृतदेह हे सरकारची प्रतिमा मलीन करणारे ठरलेत. त्यामुळे सामान्यांचा सरकारवर रोष असल्याचं दिसत आहे. विरोधकांनाही टीकेची झोड उठवली आहे.
या शनिवारी योगी आदित्यनाथ यांचा ४९वा वाढदिवस होता. सोशल मिडियावरुन शुभेच्छा देणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि अमीत शाह यांनी यंदा मात्र योगींना वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याने खळबळ माजली आहे. योगींना वाढदिवसाच्या शुभेच्छा नाहीत मात्र त्याचवेळी उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांना मोदींनी ट्विट करुन शुभेच्छा दिल्यात. मोदी आणि शाह वगळता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, डॉ. रमण सिंह, नरेंद्र सिंह तोमर, स्मृती इराणी, किरण रिजेजू आणि प्रकाश जावडेकर यांनी योगींना शुभेच्छा दिल्या आहेत.
कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कुणालाही शुभेच्छा दिलेल्या नाहीत. यात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे, असं भाजपचं म्हणणं आहे. मात्र सपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आय.पी.सिंह यांनी हे सर्व दावे खोटे असल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत तिरथ सिंह रावत यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा मात्र योगींना मोदींनी विचारलं देखील नाही, असं म्हटलंय.
पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि २०२४च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उत्तर प्रदेस सरकारमध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोदींच्या जवळचे मानले जाणारे ए.के. शर्मा यांना उत्तर प्रदेश सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळू शकते. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह हे उत्तर प्रदेशचा दौराही करु शकतात. मोठ्या फेरबदलांबाबतचा निर्णय या महिन्यात होऊ शकतो. केंद्रीय मंत्रिमंडळात यूपीच्या नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते.