मुक्तपीठ टीम
आजपासून मुंबईत युवावर्गाच्या मर्यादित लसीकरणाची सुरुवात होत आहे. महापालिकेच्या ५ केंद्रांवर १८ वर्षांवरील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरणात नोंदणी केलेल्यांचेच होणार असल्याने को-विन अॅपवर आधी नोंदणी करून आलेल्या मॅसेजप्रमाणेच लसीकरण केंद्रावर जायचे आहे. त्यामुळे थेट जाऊन गर्दी करु नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
१ मे म्हणजेच आजपासून १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण घोषित केले आहे. मात्र, केंद्र सरकारकडून ४५ वर्षांवरील गटाच्या लसीकरणासाठीच पुरेसा साठा आला नसल्याने त्यांचेच लसीकरण थंडावले आहे. आता राज्य सरकारने सर्वांचेच लसीकरण मोफत करण्याचे, तसेच साठा असेल त्याप्रमाणे लसीकरण करण्याचे आदेश दिले आहेत.
त्यानुसार आजपासून पालिकेच्या ५ रुग्णालयांत लसीकरणाला सुरुवात होत आहे. तरुणांनी थेट जाऊन गर्दी करू नये, भविष्यात लसींचा जास्त साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप त्या-त्या वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच पात्र नागरिकांचे लसीकरण व्हावे, यासाठी महापालिका आवश्यक ते सर्व नियोजन करीत असून नागरिकांनी लसीकरण करवून घेण्यासाठी गर्दी करू नये तसेच कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाद्वारे या निमित्ताने करण्यात आले आहे.
मुंबईतील लसीकरण केंद्र:
१. बा.य.ल. नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर)
२. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर)
३. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर)
४. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर)
५. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर