कोरोनानंतर आता महाराष्ट्रात बर्ड फ्लूचे संकट हातपाय पसरत असल्याचे दिसत आहे. परभणी जिल्ह्यात मुरुंबा गावातील कुक्कुटगृहातील तब्बल ८०० कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे. या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळेच झाल्याचे भोपाळच्या प्रयोग शाळेतून आलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ही माहिती परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. मुंगळीकर यांनी दिली आहे.
परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील कुक्कुट पालन करणार्या शेतकर्यांवर मोठे संकट कोसळले आहे. मुरुंबा शिवारातील कुक्कुटपालन करणाऱ्या, विजयकुमार सखाराम झाडे यांच्या कुक्कुटगृहातील तब्बल ८०० कोंबड्या अचानक मरण पावल्या. परंतु या घडलेल्या घटनेमुळे, गाव आणि परिसरामध्ये बर्ड फ्लू पसरला असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र, गावकऱ्यांचा संशय खरा ठरला असून येथे मृत्यू पडलेल्या कोंबड्या बर्ड फ्लूनेच मृत झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
हा व्हिडीओ पाहा: परभणीत कसा कळला बर्ड फ्लू?
त्यामुळे आता महाराष्ट्रात बर्ड फ्लूला शिरकाव झाल्याचे कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झाल्याने, मुरूंबा परिसरातील एक किलोमीटर अंतरातील सर्व कोंबड्यांना आणि पाळीव पक्षांना नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दहा किमी अंतरातील कोंबड्यांच्या वाहतुकीवर ही बंदी घालण्यात आली आहे. शिवाय गावातल्या लोकांचीसुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, ‘बर्ड फ्लू’ साथीचा फैलाव झालेल्या सातही राज्यांना साथप्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पशूपालन मंत्रालयाने रविवारी दिली.