मुक्तपीठ टीम
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाने राज्यात आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण झाला आहे, यामुळे अनेकांना प्राण गमवावे लागत आहेत. कोरोना उपचारात आवश्यक व्हेंटिलेटरवरून राजकीय संघर्षही घडत असताना दुसरीकडे पुसद सारख्या सरकारी रुग्णालयांमध्ये व्हेंटिलेटर धूळ खात पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. लोकांचे जीव जात असताना प्राणरक्षक व्हेंटिलेटर धुळीत पडू देण्याचे पाप कुणाचे? त्यासाठी दोषींवर कारवाई होणार का, हा प्रश्न महत्वाचा ठरत आहे.
ताजा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील पुसद उपजिल्हा रुग्णालयातील आहे. तिथे तब्बल सात महिन्यांपासून १० व्हेंटिलेटर धूळखात पडले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे रुग्णालयात जागा नाही. पुसदसारख्या छोट्या शहरांमध्येच नाही तर मोठ्या महानगरांमध्येही व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याच्या कारणावरून अनेकांना दुसरीकडे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत उपचारासाठी आवश्यक व्हेंटिलेटरसारखी यंत्रसामग्री कमी पडत असल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागतो आहे. रोजच अशा तक्रारींचे टाहो कानी पडत आहेत.
अशा भीषण परिस्थितीत पुसदच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये १० व्हेंटिलेटर धूळखात पडले आहे. हा अनागोंदी कारभार लक्षात आल्यानंतर पुसद येथील नगरसेवक साकीब शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे तक्रार केली. व्हेंटिलेटरअभावी अनेक लोकांना प्राणाला मुकावे लागले आणि अशात जीव वाचविणारी यंत्र सामुग्री धूळखात पडलेली असल्याने ती त्वरित जनसामान्यांच्या उपयोगात आणावी अशी विनंती त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडेही केली.
पीएम केअर फंड अंतर्गत रुग्णालयाला मिळाले होते व्हेंटिलेटर
- गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात पंतप्रधान योजनेतून १० व्हेंटिलेटर पुरवण्यात आले होते.
- मात्र भूलतज्ज्ञ,डॉक्टर उपलब्ध नसल्याने व्हेंटिलेटर आजपर्यंत उपयोगात आले नाही.
- आता प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यापैकी ५ व्हेंटिलेटर्स यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात येत आहेत, असे डॉ. हरिभाऊ फुफाटे यांनी सांगितले.
आज व्हेंटिलेटर धूळखात पडून असल्याचा प्रकार पुढे आल्यानंतर पुसद उपविभागीय अधिकाऱ्यांनी पुसद उपजिल्हा रुग्णालयात पाहणी केली .