मुक्तपीठ टीम
आसाम राज्यातील विधानसभा निवडणुकीत दिमा हसाओ जिल्ह्यात एक ईव्हीएम चमत्कार घडला आहे. तेथे एका मतदान केंद्रावर फक्त ९० मतदारांची नोंदणी होती. पण या ठिकाणी १८१ मतदान झाल्याचे उघड झाले आहे.
हे प्रकरण गंभीरतेने घेत निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. या मतदान केंद्रावरील ५ निवडणूक अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तेथे पुन्हा मतदान होणार आहे. पण मुळात फूल प्रुफ असल्याचा दावा करण्यात येणाऱ्या ईव्हीएममध्ये असं झालंच कसं, अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
आसामचे मुख्य निवडणुक अधिकारी नितीन खाडे म्हणाले की, ए. खोथलेर एलपी स्कूलमध्ये प्रथमच मतदान केंद्र बनविण्यात आले. हे मतदान केंद्र हाफलांग विधानसभा मतदार संघात आहे. दुसर्या टप्प्यात १ एप्रिल रोजी मतदान झाले. हाफलांगमध्ये ७४ टक्के मतदान झाले.
पीठासीन अधिकाऱ्याने दुप्पट मतदान करण्याचे मान्य केले
- हे मतदान केंद्र खोथलीर एलपी स्कूलच्या १०७ (ए) मध्ये होते. ९० मतदार असूनही १८१ मते पडली.
- आसाममध्ये पुन्हा मतदान होणार असलेली विधानसभेची ही दुसरी जागा आहे. निवडणूक अधिकारी म्हणाले की, या मतदान केंद्रावर पुन्हा निवडणुकीचे आदेश देण्यात आले आहेत.
- दरम्यान, आसाममध्ये आज तिसऱ्या टप्प्याचं आणि अखेरच्या टप्प्याचं मतदान होणार आहे. आसाममध्ये आज ४० जागांसाठी मतदान होत आहे. या जागांसाठी ३३७ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.