मुक्तपीठ टीम
तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांचा प्रचार जोरात आहे. त्याआधी आयकर विभागाने द्रमुकचे सर्वेसर्वा एमके स्टालिन यांचे जावई सबारेसनशी संबंधित जागांवर छापे टाकले आहेत. याआधी बंगालमध्ये ईडीने केलेली कारवाई चर्चेचा विषय ठरली होती. तेथे तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर जुन्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे.
तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या २३४ जागांवर ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानापूर्वी एमके स्टालिन यांच्या जावयाच्या ठिकाणांवर आयकर विभागाच्या कारवाईने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ईडीची बंगालात कारवाई
- ईडीने जनावरांच्या तस्कराकडून लाच घेऊन एका कंपनीत गुंतवल्याच्या मनी लॉंड्रिंग प्रकरणात तृणमुलचे नेते विनय मिश्रा आणि त्यांचे भाऊ विकास मिश्रा यांच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. १९ मार्च रोजी झालेल्या या कारवाईतील विकास मिश्रा हे अटकेत आहेत.
- याआधीच चिट फंड प्रकरणात तृणमूलचे नेते मदन मिश्रा, खासदार सपन बोस, अहमद हसन इम्रान, माजी खासदरा कुणाल घोष आणि माजी पक्ष नेते चित्रकार सुवप्रसन्ना यांची चौकशीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
- बंगालात निवडणुकीचे वातावरण तापले असतानाच ईडीने केलेली कारवाई चर्चेचा विषय झाली आहे.
बंगालनंतर मोदी तामिळनाडूत!
- केरळ, तामिळनाडू आणि केंद्र शासित प्रदेश पुदुच्चेरीत विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर प्रचारसभा घेण्यासाठी तामिळनाडूमध्ये दाखल झाले आहेत.
- यावेळी आज ते भारतीय जनता पार्टी (भाजप) आणि आण्णा द्रमुकच्या मदुराई आणि कन्याकुमारी येथील सभांना संबोधित करतील.