कोरोना प्रतिबंधक लसीच्या लसीकरणासाठी आरोग्य मंत्रालय को-विन (Co-WIN) अॅप लॉन्च करणार आहे. पण हे अॅप्स ऑफिशिअल लॉन्च होण्याआधीच प्ले स्टोरवर ‘Co-WIN’ नावाचे अनेक बनावट अॅप्स दिसत आहेत.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी याबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, गूगल प्लेस्टोअरवर को-विन अॅप डाउनलोड करू नका. या बनावट अॅप्समुळे आपली वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते. सोशल मीडियावर ते म्हणाले की, सरकारने अद्याप अधिकृत को-विन अॅप सुरू केलेला नाही. त्यामुळे या नावाचे कोणतेही अॅप डाउनलोड करु नका. अॅप सुरू करताना त्याची माहिती दिली जाईल.
‘को-विन’ अॅप आहे तरी कसे?
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लसीकरणासाठी को-विन अॅप तयार केला आहे. यामुळे लस वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी मदत होईल. अॅपच्या माध्यमातून सरकारला लसीकरण झालेल्या लोकांची माहिती ठेवण्यासाठी सोईचे जाईल. या अॅपवर नोंदणी केल्यानंतरच लोकांना लस दिली जाईल.
‘Co-WIN’ (कोविड -१९ व्हॅक्सीन इंटेलिजेंस नेटवर्क) ही ‘eVIN’ (इलेक्ट्रॉनिक व्हॅक्सीन इंटेलिजेंस नेटवर्क) ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. अॅपचे काम पूर्ण झाल्यानंतर ते गुगल प्लेस्टोअर आणि अॅपल प्लेस्टोअरवरील वापरकर्त्यांसाठी विनामूल्य उपलब्ध केले जाईल.
लसीची माहिती लोकांना देण्यासाठी १२ भाषांमध्ये एसएमएस पाठविला जाईल. लस घेतल्यानंतर एक क्यूआर कोड प्रमाणपत्र दिले जाईल जे आपल्याला मोबाईलमध्ये ठेवता येईल. क्यूआर कोड प्रमाणपत्रे संचयित करण्यासाठी सरकारचे स्टोरेज अॅप ‘डिजीलोकर’या मध्ये सर्व माहिती एकत्रित असेल. यासह २४×७ सुविधा देखील उपलब्ध होतील.
३ टप्प्यात लसीकरण केले जाईल
आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे की, “कोरोना लस ३ टप्प्यात दिली जाईल. यामध्ये पहिल्या टप्प्यात सर्व फ्रंटलाइन हेल्थकेअर व्यावसायिकांचा समावेश आहे. दुसर्या टप्प्यात आपत्कालीन सेवांशी जोडलेले लोक असतीत. अखेरीस गंभीर परिस्थिती असलेल्या लोकांना लस दिली जाईल.”