मुक्तपीठ टीम
लोकप्रिय ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना २०२०चा ‘महाराष्ट्र भूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
यावेळी समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि इतर सदस्य उपस्थित होते. पुरस्कारासाठी आशा ताईंच्या नावाची घोषणा करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले.
एव्हरग्रीन एव्हरयंग आवाज म्हणजे आशा भोसले. आपल्या मधूर आणि विविधतेने नटलेल्या सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातील नाही तर जगभरातील रसिकमनावर अधिराज्य गाजवत आहेत. ‘माझा बाळ’ या चित्रपटाला त्यांनी प्रथमच आवाज दिला होता. आतापर्यंत हिंदीसह अनेक भाषांमध्ये त्यांनी हजारो गाणी गायली आहे.
आशाताईंना मिळालेले काही पुरस्कार
- २०००-२००१ चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ‘दादासाहेब फाळके सन्मान’
- २००८ पद्मविभूषण पुरस्कार बहाल करण्यात आला आहे.
- मध्य प्रदेश सरकारचा ‘लता मंगेशकर पुरस्कार’
- राष्ट्रीय पुरस्कार, अनेक फिल्मफेअर पुरस्कार आणि महाराष्ट्र सरकारचे १५ पेक्षा जास्त पुरस्कार आशाताईंना देण्यात आले आहेत.