मुक्तपीठ टीम
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. परमबीर यांनी त्या पत्रात राज्याचे गुहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचा आरोप केला होता. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रातील आरोपांची चौकशी व्हावी, या मागणीसाठी परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
काही दिवसांपूर्वी परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले होते. राज्याचे गुहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची वसुली करण्याचा आरोप केला होता. या पत्रावरुन आता सत्ताधाऱ्यांनी सिंह यांच्यावरच उलट आरोप करायला सुरुवात केली आहे. अशा स्थितीत आता सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात या आरोपांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात यावे अशी मागणी केली आहेत.
परमबीर सिंह यांनी पदावर असताना हे आरोप का केले नाही? तर सत्ताधाऱ्यांकडून परमबीर यांचे पत्र हे भाजपाचा कट असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे या आरोपानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले आहे.
आणखी काय आहे याचिकेत?
- एकूण १३० पानांची याचिका मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दाखल केली आहे.
- गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्टाचाराबाबत मी केलेल्या तक्रारीची निष्पक्ष, कोणत्याही दबावाविना आणि कोणाचीही बाजू न घेता चौकशी व्हावी.
- पुरावे नष्ट होण्यापूर्वी याची सत्यता तपासणे आवश्यक आहे.
- फेब्रुवारी २०२१मध्ये अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सचिन वाझे आणि संजय पाटील यांच्यासोबत बैठक झाली होती. त्याच बैठकीत महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे सांगितले होते.
- रश्मी शुक्ला यांनीही अनिल देशमुखांकडून भष्ट्राचार होत असल्याचे सांगितले होते. मात्र त्यावेळी देशमुखांएवजी रश्मी शुक्ला यांनाच सुनावण्यात आले होते.
- अनिल देशमुख अनेक प्रकरणांच्या तपासांमध्ये हस्तक्षेप करुन पोलीस अधिकाऱ्यांना आपल्याला हव्या तशा सूचना देत होते.
- या सर्व गोष्टींचे दाखले परमबीर सिंह यांनी आपल्या याचिकेत दिले आहेत.