मुक्तपीठ टीम
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स म्हणजेच एडीआरने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालात २०१६ ते २०२० मध्ये निवडणुकांच्यावेळी आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्या आयाराम-गयारामांची आकडेवारी सादर केली आहे. अहवालानुसार काँग्रेसच्या १७० आमदारांनी इतर पक्षात प्रवेश केला. तर भाजपाच्या फक्त १८ आमदारांनी दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेतला.
एडीआर अहवालानुसार कोण गेले कुठे?
• २०१६ ते २०२० मध्ये पक्ष बदलून पुन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणाऱ्या ४०५ आमदारांपैकी १८२ आमदारांनी भाजपात प्रवेश केला होता
• २८ आमदारांनी काँग्रेसचा हात हाती घेतला.
• २५ आमदारांनी तेलंगणा राष्ट्र समितीला आपलं मानलं.
• २०१९च्या लोकसभा निवडणुकीतही पाच लोकसभा सदस्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता.
• २०१६ ते २०२० मध्ये काँग्रेसच्या सात राज्यसभा सदस्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश केला होता.
• २०१६ ते २०२० दरम्यान पक्ष बदलून पुन्हा राज्यसभेची निवडणूक लढविणाऱ्या १६ राज्यसभेतील सदस्यांपैकी १० जणांनी भाजपावासी झालेत.
सातत्याने गळती होत आहे तरीही काँग्रेस सावध होत आहे असे दिसत नाही. आजही पक्षांतर्गत नाराजी वाढतीच आहे. काँग्रेस पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी, जी २३ म्हणून ओळखल्या जाणार्या या नेत्यांनी बैठक आयोजित केली होती. केरळमधील कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांमध्ये गणले गेलेले पीसी चाको यांनीही बुधवारी पक्ष सोडला. त्यांनी आपला राजीनामा पक्षाध्यक्षांना पाठवला होता.
या ज्येष्ठ नेत्यांना समजवून सोबत ठेवण्यासाठी काँग्रेसकडून म्हणावे तसे प्रयत्न होताना दिसत नाही. काँग्रेसने पाच राज्यांच्या निवडणुकांसाठी स्टार प्रचारकांची यादी नुकतीच जारी केली. या यादीत अपवाद वगळता जी-२३ च्या नेत्यांपैकी कुणाचेही नाव नाही.