मुक्तपीठ टीम
जगभरात दुसऱ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी ट्विटरसारखं माध्यम चालवणाऱ्या ट्विटरच्या कर्मचाऱ्यांच्या रोजगारावरच आता संकट आलं आहे. ट्विटरने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या एचआर टीममधून सुमारे ३० टक्के कर्मचारी काढले आहेत. जगभरातील मंदीच्या भीतीच्या पार्श्वभूमीवर, खर्च कमी करण्याच्या नावाखाली मनु्ष्यबळ कपात करणार्या टेक कंपन्यांच्या यादीत ट्विटरचं नाव जोडलं गेलं आहे.
ट्विटरच्या टॅलेंट हंट टीममधील जवळजवळ १०० जणांना नोकरी गमवावी लागली आहे. मे महिन्यात कंपनीकडून सांगण्यात आले होते की, ते आपला खर्च कमी करण्यासाठी नव्या नियुक्तींची प्रक्रिया थांबवत आहे. आता कंपनीकडून असे सांगण्यात आले आहे की, कंपनी सुधारित व्यवसाय आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आणि कमी करण्यासाठी आपल्या एचआर टीमची पुनर्रचना करत आहे.
एकीकडे कर्मचारी कपात केली जात असतानाच ट्विटरला दुसरा धक्का बसला आहे, तो एलॉन मस्क यांनी ट्विटर विकत घेण्याचा निर्णय रद्द केल्यामुळे! ४४ अब्ज डॉलरच्या ट्विटर डीलमधून मस्क बाहेर आले आहेत. ही बातमी येताच ट्विटरच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे.