हेरंब कुलकर्णी
महाराष्ट्रातील बालसंगोपन योजनेच्या ५४००० लाभार्थीं मुलांना यापुढे दरमहा ११२५ रूपयांऐवजी २५०० रूपये अनुदान मिळणार आहे व कोरोना एकल महिलांना रोजगारासाठी पंडिता रमाबाई व्याजमाफी योजनेंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून दोन वर्षांसाठी १ लाख रूपये बिनव्याजी मिळणार आहेत.महाराष्ट्रातील हजारो विधवा महिलांसाठी हा अतिशय आनंददायी निर्णय आहे.
काल विधानसभेत महिला बालकल्याण मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही घोषणा केली.
गेली कित्येक महिने आम्ही या निर्णयाचा पाठपुरावा करत होतो.
मागच्या वर्षीच्या बजेटमध्ये अजितदादा पवार यांनी ११२५ ची रक्कम २५०० केली पण शासन आदेश निघू शकला नाही व सरकार बदलताच नव्या सरकारने त्याला स्थगिती दिली. त्यानंतर आम्ही सतत पाठपुरावा निवेदने दिली. विधानपरिषद उपसभापती निलम गोऱ्हे यांनी यावर बैठक घेतली. आमचे कार्यकर्ते मिलिंद साळवे व अशोक कुटे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सचिव श्रीकर परदेशी यांच्यासोबतही मिलिंद साळवे यांनी बैठक घेतली. अजितदादा यांना ठिकठिकाणी निवेदने दिली.
शरद पवार यांनी जाहीरपणे सरकारवर नाराजी व्यक्त केली. या सर्वाचा परिणाम म्हणून एकूण ५४ आमदारांनी कोरोना विधवा महिलांच्या समस्या वबालसंगोपन योजनेवर प्रश्न विचारले.इतकी मोठी जागृती या विषयावर झाली व निर्णय झाला.
त्याचप्रमाणे आमच्या विनंतीवरून कोरोना विधवा महिलांना बिनव्याजी कर्जयोजना असावी म्हणून आम्ही मागणी केली होती.त्यासाठी पंडिता रमाबाई व्याजमाफी योजना आली होती. पण या सरकारने स्थगिती दिली होती.पण आता या महिलांना बिनव्याजी १ लाख रुपये कर्ज मिळणार आहे. या दोन्ही निर्णयाबद्दल सरकारचे अभिनंदन.. आमचे ८१ तालुक्यातील कार्यकर्ते सतत पाठपुरावा करत राहतात. त्याचा परिणाम म्हणून या महिलांचे अनेक विषय मार्गी लागत आहेत हे समाधान आहे.
आपल्या परिचयाच्या विधवा महिलांच्या मुलांना जवळच्या महिला बालकल्याण विभागात संपर्क करून ही योजना मिळवून द्या. १८ वर्षे दोन मुलांना पैसे मिळतात.
हेरंब कुलकर्णी
8208589195
(हेरंब कुलकर्णी हे शिक्षण, सामाजिक क्षेत्रातील ज्येष्ठ अभ्यासक आणि कार्यकर्ते आहेत. कोरोना काळात अनाथ झालेली मुलं, वैधव्य आलेल्या महिलांसाठीही ते कोरोना एकल पुनर्वसन समितीचे राज्य निमंत्रक म्हणून सातत्यानं कार्यरत आहेत.)