मुक्तपीठ टीम
वेदघोष, मंत्रपठण, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सत्कार, पारितोषिक वितरण, सदिच्छा भेटी, स्नेहमेळावा अशा विविध कार्यक्रमांनी पुणे विद्यार्थी गृहाचा ११३ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला. दोन वर्षे कोरोनामुळे वर्धापनदिन साधेपणाने साजरा करण्यात येत होता. यंदा सकाळपासून संध्याकाळपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक दादासाहेब केतकर यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, सदस्य पूर्णिमा लिखिते यांच्यासह कार्याध्यक्ष सुनील रेडेकर, उपकार्याध्यक्ष एस. एम. जिर्गे, कार्यवाह राजेंद्र कांबळे, कोषाध्यक्ष आनंद कुलकर्णी, कुलसचिव अमोल जोशी, संचालक मंडळातील संजय गुंजाळ, रमेश कुलकर्णी, राजेंद्र बोऱ्हाडे, राजेंद्र कडुसकर, कृष्णाजी कुलकर्णी, दिनेश मिसाळ यांच्यासह सदानंद केंगे, एस. के. लिमये, अमरेंद्र गोरे, म. अ. जोशी आदी उपस्थित होते.
संस्थेच्या आवारातील राम-लक्ष्मण मंदिरात कार्याध्यक्ष सुनील रेडेकर यांच्या हस्ते सकाळी अभिषेक करण्यात आला. यानंतर संस्थेचे ज्येष्ठ माजी विद्यार्थी रमेशचंद्र कुलकर्णी (वय ८४) यांचे ‘पत्रसंवाद भाग १ व २’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. पुस्तक विक्रीच्या रकमेतून एक लाख रुपयाची देणगी कुलकर्णी यांनी संस्थेला दिली. समितीचे हितचिंतक डॉ. सतीश देसाई, शामकांत देशमुख, अनुसंधान समितीचे हणमंत भोसले, कृष्णाजी शिरकांडे आदी उपस्थित होते.
माजी विद्यार्थी स्नेहमेळाव्यात ‘मला संस्थेने काय दिले’ या विषयावर विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कोरोना काळात घेतलेल्या ऑनलाईन स्पर्धांतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. माजी विद्यार्थी महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. वर्षभराचा आलेख मांडत कार्याचा आढावा घेण्यात आला.
कोरोना काळात विविध विभागातील निवृत्त सेवकांचा सत्कार करण्यात आला. सायंकाळच्या सोहळ्याची सुरुवात पाच ब्राह्मणांच्या मंत्रघोषात झाली. संस्थेच्या सर्व शाखांतील पदाधिकारी, कर्मचारी, माजी विद्यार्थी, देणगीदार, हितचिंतक आदींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. सदिच्छा भेटीसह पानसुपारीचा कार्यक्रम झाला.