Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home सरळस्पष्ट

काळ बदलतोय…माध्यमांची कायाही बदलणारच…आत्मा हरवू नये!

January 6, 2021
in सरळस्पष्ट
0
काळ बदलतोय…माध्यमांची कायाही बदलणारच…आत्मा हरवू नये!

मोदी मीडिया…गोदी मीडिया…प्रेस्टिट्युट…प्रेश्या…चहा-बिस्किट पत्रकार…नाव बदलतं. पण पत्रकारांसाठी वापरले जाणारे असे शब्द वाढतच चाललेत. त्यांचा वापरही. आता तर रस्त्यावरीव सामान्य माणूसही बिनदिक्कतपणे यातील शब्द पत्रकारांसाठी वापरतो. तंत्रज्ञानातील बदलामुळे प्रगती जशी वेगवान होण्याची संधी उपलब्ध झाली तशीच गैरमाहितीच्या प्रादुर्भावाचा वेगही जास्तच वाढला. तसाही दुर्गंध जास्त लवकर पसरतो. अगदी तसंच. त्यातच आपली माध्यमंही काही वेळा अशा फेकन्यूजच्या जाळ्यात अडकू लागली. किंवा काही तर जाणीवपूर्वकच फेक न्यूजच न्यूज आहे असं मोठ्यानं बोंबलत ठासून मांडू लागली. पुन्हा यात एकच विचारसरणी सामील आहे, इतर दुसरे सोवळ्यात आहेत, असंही नाही. फक्त कुणी त्यात पदवीधर तर कुणी दहावी नापास. एवढाच काय तो फरक. त्यामुळे पुन्हा पणाला लागत राहतेय ती पत्रकारांची आणि पत्रकारितेचीही विश्वसनीयता.
नुकतेच एक नवा शब्द वापर सुरु केला गेलाय. कुत्रकार. त्यात पुढचा टप्पा चहा-बिस्किट पत्रकार. रिपब्लिक या चॅनलच्या पत्रकाराने तो मुंबईतील पत्रकारांसाठी वापरला आणि संतापाचा स्फोट झाला. खरंतर चहा-बिस्किट पत्रकार हा अभिमान वाटावा असाच विषय. कुणीतरी फेकलेली हाडं चघळत नसलेल्या बातमीला बातमी ठरवण्यासाठी लूत भरल्यासारखं वागण्यापेक्षा स्वत:च्या खर्चानं चहा-बिस्किटवर कित्येक तास काढत बातमीसाठी राबणं हे अभिमानाचेच. माध्यमांमधील प्रत्येकाला हे ठाऊक असतं. काही वेळा खिशात पैसे असतातही. पण वेळ नसतो. वेळ असला तरी जिथं पत्रकार असतात, तिथं उपलब्ध नसतं. खूप काही माहित असूनही आपलंच कुणीतरी सुपारीबाजी करून हिणवतं तेव्हा संतापाचा स्फोट होणं स्वाभाविकच होतं. तरीही या सर्वाचा पत्रकारांनी शांतपणे विचार करावा असं वाटतं. आणि आत्मपरीक्षणही.
काळ बदलतोय. माध्यमांची कायाही बदलतच जाणार. माध्यमंही बदलतायत. तुम्हीच आठवा.
व्हीएचएस…डीव्ही…मिनी डीव्ही…मेमरी कार्ड…आता तर फक्त मोबाइल!
लिनिअर…नॉन लिनिअर…आता तर फक्त मोबाइलवरही!
कन्टेन्टची टेप विमानानं परदेशी जाणं. तिथून अपलिंक. त्यानंतर दूरदर्शनची मक्तेदारी असल्यानं त्यांच्याकडूनच परदेशात कन्टेन्ट पाठवणं, मग तिथून ते अपलिंक होणं. आता ओबीही आऊटडेटेड ठरतेय. काही दिवसांनी लाइव्हचे बॅगपॅकही अनावश्यक ठरतील. सध्या सुरुवात झालीय…पुढे मुख्य तेच असेल…फक्त मोबाइल.

२०१३ला एका नव्या मराठी चॅनलमध्ये आम्ही मोबाइल रिपोर्टर हा कार्यक्रम सुरु केला होता. तेव्हा अनेकांना खटकलंही असेल. पण आता तोच मोबाइल सर्रास वापरला जातोय. उलट काही प्रमाणात का होईना पण पूर्वीच्या अवजड साधनांना लाजवेल असा दर्जाही देतोय.
टीव्ही पत्रकारितेत गेल्या तीन दशकातील हे बदल. फक्त रेकॉर्डिंग करणाऱ्या साधनांमधील नाहीत, तर सारंच काही वेगवान आणि तरीही आटोपशीर करणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं वेगानं पुढं निघालेल्या एकंदर टीव्ही पत्रकारितेतील आहेत. तसेच बदल प्रिंट मीडियातही झालेत. याच काळात. खिळे जुळणी कधीच मागे पडलेली. डीटीपीनं मजकूर चिकटवून पान बनवणं सुरु झालं. पुढे संपूर्ण पानच तयार होऊ लागलं. आता तर सर्व काही पत्रकारच करु लागलेत. फक्त तांत्रिकदृष्ट्या योग्य जावं यासाठी पेज डिझायनर असतील.

सध्या वेगानं वाढत असलेलं डिजिटल माध्यम तर आता भविष्यच म्हणून वर्तमानात वेगानं विकसित होऊ लागलंय. टेक्स्ट, व्हिडीओ, फोटो असे वेगवेगळे प्रयोग डिजिटल माध्यमात सुरु झालेयत. एका अभ्यास अहवालानुसार प्रिंटचे वाचक जसे डिजिटलकडे वळले तसेच टीव्हीचे प्रेक्षकही डिजिटलकडे वळू लागलेत. कोरोना संकटामुळे ती प्रक्रिया जास्त वेगानं होत आहे. त्या अहवालानुसार २०२७पर्यंत टीव्हीच्या जाहिरात महसुलातील बहतांश भाग डिजिटलकडे वळलेला असेल.

थोडक्यात माध्यमं आता मोबाइलवर आलीत. त्याचवेळी माध्यमांचा वापरकर्ता वर्ग मग ते वाचक असतील किंवा प्रेक्षक तेही वॉल युनिट टीव्हीपासून दुरावत मोबाइलवरच स्थिरावू लागलेत. जाहिरातदारही येऊ लागलेत. माझ्यासारखे शेकडो पत्रकार असतील जे अख्खी वेबसाइट किंवा चॅनल मोबाइलवरूनही चालवण्याची महत्वांकाक्षा बाळगत असतील. गरज नाही भासत अनेकदा लॅपटॉपचीही. सर्व काही मोबाइलवरच. म्हणजे क्रिएटर ते यूजर सारं काही मोबाइलवरच. शक्य आहे. काळानुसार असे बदल होत जाणार. माध्यमांचा कायाकल्प होत राहणार. तो झालाच पाहिजे. नव्हे काळानुसार बदलावंच लागतं. जे नाही बदलत ते संपतात. बदल आवश्यकच. पण तो कायेत झाला तर समजू शकतो. बदलता बदलता माध्यमांचा आत्मा म्हणजे कन्टेंटचा अजेंडाच हरवू लागला आहे की काय? मला वाटतं इथं सर्वच पत्रकारांनी आत्मनिरीक्षण केलं पाहिजे. ज्यांना ज्यांना पत्रकारांसाठी वापरले जाणारे प्रेस्टिट्युट…प्रेश्या…चहा-बिस्किट पत्रकार हे शब्द खुपतात त्या प्रत्येकानं तर नक्कीच!

काळानुसार तांत्रिक बदलाचा कायाकल्प योग्यच. झालाच पाहिजे. पण कन्टेन्टचं काय? त्यातील मांडणीचे बदलही काळानुरुप होणारच. पण आत्मा कसा बदलू द्यायचा? माहितीला बातमीत बदलण्याचं कर्तव्य ज्यांनी बजावणं अभिप्रेत असतं ती माध्यमं. माहितीला बातमीत बदलण्याची एक प्रक्रिया असते. योग्य सुत्रांकडून माहिती घ्यावी लागते, तिची पडताळणी करावी लागते, पुन्हा जर त्यात कुणावर आरोप असतील तर ती बाजू जाणून घेणं अभिप्रेत असतं. त्यानंतरच एखादी माहिती बातमीत बदलते. सध्या मात्र, सर्रास आलेली प्रत्येक माहिती ही बातमीच मानली जाते. काही मोठ्या प्रकरणांमध्ये पत्रकारांना खूपणारं असं काही खूप काही घडतं.

मराठी माध्यमांनी आपलं स्वतंत्र अस्तित्व गमावलंच की काय असं वाटतं. प्रत्येक माध्यमाचं आपलं एक धोरण असते. हे धोरण संपादकीय प्रभावाखाली तयार होतं. झालंही पाहिजे. त्यातूनच बातम्यांच्या निवडीतील, मांडणीत बदल घडतात. ते समजू शकतात. पण चॅनलचा अजेंडा त्याच चॅनलच्या संपादकाने, पत्रकारांनी ठरवला पाहिजे. काही वादग्रस्त प्रकरणांमध्ये अनेकदा घडतं वेगळंच. हिंदी-इंग्रजी चॅनलला सुत्रांच्या हवाल्यानं काही चाललं की असाइनमेंट डेस्ककडून रिपोर्टरला फोन जातात. तुझं लाइव्ह असेल. फोनो असेल. फिल्ड रिपोर्टरला तपासण्याची संधीही न देता थेट आऊटपुटला दुसऱ्या चॅनलच्या स्क्रिनवर चाललेली माहिती बातमी म्हणून दिली जाते. रिपोर्टरला प्रतिवादाची संधी न देताच लाइव्हला उभं केलं जातं. रिपोर्टर जर कसलेला अभिनेता नसेल तर त्याच्या चेहऱ्यावरून तोच जे सांगतोय त्या माहितीशी सहमत किंवा माहितीबद्दल विश्वास नसल्याचं कळतं. अनेकदा त्यानं दबावाखाली दिलेली माहिती ही त्यानं नंतर मिळवलेल्या स्वत:च्या बातमीपेक्षा खूपच वेगळी असते. नंतर तीही चालवली जाते. काहीवेळा चॅनलचं नाव खराब नको म्हणून त्याची मेहनतीची बातमी दडपली जाते. त्यात मग सामान्य प्रेक्षकांची फसवणूक होते आणि पुढे बातम्या खोट्या ठरल्या की माध्यमांबद्दलचा विश्वासच खंगू लागतो.

गेली काही वर्षे, काही मराठी चॅनलमध्ये स्पर्धेपोटी एकमेकांचे फ्लॅश, ब्रेकिंग अगदी व्याकरणाच्या चुकांसह उचलणं सुरु झालं होतं. पण किमान ते मराठी चॅनलमधील घटना-दुर्घटनांच्या बातम्यांचं असायचं. क्वचित एखाद्या बातमीत वेगळा हिडन अजेंडा असायचा. आता मात्र हिडन अजेंडा हाच ज्यांचा रिअल अजेंडा असतो, अशांच्या स्क्रिनवर बातमी झळकली की अगदी हिंदी शब्दांसह तशीच चालवण्याची घाई होते. तिथं चालतंय ना, मग आपणही तेच चालू करत प्राइम टाइम शोही त्यावरच रंगतात. न्यूजरुममधील पत्रकार एक विसरतात की आपण आपला अजेंडा ठरवण्याचा अधिकारच गहाण टाकतोय. दुसऱ्याच कुणाचा तरी, भलत्याच कुणीतरी दिलेला अजेंडा आपण आपला म्हणून चालवतोय. प्रादेशिक स्तरावर तेवढी यंत्रणा नसते. साधने कमी असतात. माहिती हिंदी, इंग्रजीतून घ्यावी लागते. मात्र, माहिती, बातमी तपासून घेणं वेगळं आणि जे घडतंच नसतं ते केवळ वेगळं काही तरी आहे म्हणून जसंच्या तसं चालवणं हे वेगळं. अनेक रिपोर्टर याबाबतीत खाजगीत स्पष्टपणे नाराजीच नाही संताप व्यक्त करतात. चॅनलनं आपला अजेंडा आपण ठरवणं सोडून देणं म्हणजे आत्मा हरवणं. काळानुसार काया बदलणं योग्यच, पण आत्मा हरवणं पटत नाही. यामुळे पत्रकारितेतील त्या अपप्रवृत्तींनाच बळ मिळतं ज्या चहा-बिस्किट पत्रकार म्हणून खऱ्या पत्रकारांना हिणवतात.

काळानुरुप बदलणाऱ्या आपल्या पत्रकारितेनं कन्टेन्टच्या आत्म्याशी इमान राखणं आवश्यक आहे. तो आत्मा कायम राखला तर कुणी कितीही गोंगाट केला तरी ठामपणे मांडलेली आपली माहिती, आपलं मतच योग्य असल्याचं लोकांच्या मनावर ठसेल. खरं तर आता धोका वाढतोय. प्रस्थापित माध्यमांची मक्तेदारी समाज माध्यमांनी मोडून काढलीय. प्रस्थापित माध्यमांनी जर सकारात्मक दृष्टीनं पाहिलं तर कॉर्पोरेट कंपन्यांमधील क्लॉलिटी कंट्रोलसारखं काम समाजमाध्यमांचा वापर करून घडवलं जावू शकतं.

दुसरीकडे हीच समाजमाध्यमं आता वापरूनही घेतली जात आहेत. व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी सध्या फेक न्यूज किंवा फेक इन्फर्मेशन म्हणजे गैरमाहितीसाठी उपरोधानं वापरला जाणारा शब्द. त्यातून अनेकदा पद्धतशीरपणे कुणाबद्दलही, काहीही, कधीही, कुठेही आणि कुणीही पसरवू लागलंय. पत्रकारितेची प्रतिमा बिघडवण्यासाठी याच माध्यमांमधून काही हितसंबंधितांनी पद्धतशीर प्रयत्न केलेत. करत आहेत. आता तर त्यासाठी मोबाइलवर उपलब्ध अ‍ॅपचा वापर करुन हुबहुब प्रतिमा तयार केली जाते. व्हिडीओ धुर्तपणे गैरसमज व्हावे असे एडिट केले जातात. त्यातून चूक नसतानाही काहीवेळा माध्यमांची, पत्रकारांची बदनामी होते. खूप नुकसान होते. बोट अकाऊंटचा गैरवापर करून किंवा बोट्ससारखेच प्रोग्राम्ड वागणारी माणसं वापरून ट्रोल केलं जातं. जाणीवपूर्वक त्रास दिला जातो. बदनामी केली जाते. यावर उपाय पत्राकारांनी टेक्नॉलॉजीला आपलंसं केलं पाहिजे. फेक न्यूज, डिप फेक व्हिडीओ ओळखण्यास शिकलं पाहिजे. आपला स्मार्नेसच आपल्याला सक्षम बनवेल. सुरक्षित राखेल.

लेख लांबत असूनही हे उदाहरण घेतलं. कारण माध्यमांची विश्वसनीयता संपवू पाहणारे एकाच विशिष्ट विचारांचे, विचारसरणीचे आहेत असं नाही. माध्यमांची विश्वनीयता संपावी हा बहुतांश राजकारणी, अर्थसम्राटांचा हिडन अजेंडा असावा, अशी शक्यता आहे. माध्यमांबद्दल अविश्वास निर्माण केला तर त्यांनी दिलेली बातमी, मांडलेली भूमिका हे सारंच संशयाच्या भोवऱ्यात उभं करता येतं. आपण जे करू त्यातील चुकीचं उघडं पाडलं तर माध्यमांनाच संशयाच्या भोवऱ्यात ओढून आपल्याला वाचवता येतं. ट्रोलरच्या टोळ्या यासाठीच पाळल्या जातात. प्रस्थापित माध्यमांमध्ये राजकीय हस्तक्षेपानं आपल्या सोयीची माणसं नेमली जातात. माध्यमं त्यासाठीच अंकित ठेवली जातात. कणा नसलेले प्राणी पटकन सरपटतात. इथंच खरी पत्रकारांची जबाबदारी वाढते. आता प्रत्येक बातमीकडे जबाबदारीनं पाहिलंच पाहिजे. आपली बातमी हीच आपल्या विश्वसनीयतेचा पुरावा राहणार आहे. आपला कन्टेन्टचा आत्मा कायम राहिला तर लोकांच्या मनातील विश्वास कायम राहिल. इतर कुणी कितीही घात-पात केला, अपप्रचाराची राळ उठवली तरी फरक पडणार नाही. गरज फक्त आपण आपलं इमान कायम राखण्याची आहे. सर्वात महत्वाचं, केवळ कॅमेऱ्याची लेन्स स्वच्छ करून उपयोग नाही तर चेहराही स्वच्छच असला पाहिजे!

–    तुळशीदास भोईटे


Tags: journalistsocial media
Previous Post

सुशांतचा तपास, सर्वच नापास !

Next Post

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी दोन चॅनेल्सच्या मालकांना जामिन

Next Post
32 हजार कोटींचा धंदा, टीआरपी युद्धाचा खरा अजेंडा !

टीआरपी घोटाळ्याप्रकरणी दोन चॅनेल्सच्या मालकांना जामिन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!