मुक्तपीठ टीम
गेली काही वर्षे आर्थिक संकटात सापडलेल्या झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस लिमिटेड (ZEEL) या कपंनीचा संकटमुक्तीचा मार्ग स्पष्ट झाला आहे. झीच्या संचालकमंडळाने मंजुरी दिल्यानंतर सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (SPNI) आणि ‘झी’चे विलीनीकरण अधिकृत जाहीर झाले आहे. नव्या रचनेत ‘झी’चे पुनित गोयंकाच नव्या कंपनीचे एमडी आणि सीईओ म्हणून कायम राहतील. नव्या कंपनीमध्ये सोनी पिक्चर्सच्या भागधारकांचा बहुसंख्य हिस्सा असेल. तर उरलेला ४७.०७ टक्के भाग झीकडे असेल. नवी कंपनी एक समूह म्हणून प्रेक्षक संख्येच्या बाबतीत स्टार समुहाला मागे टाकण्याची शक्यता आहे.
झी ग्रुपचे एमडी आणि सीईओ पुनित गोयंका हे सोनी पिक्चर्समध्ये झी एंटरटेनमेंटच्या विलीनीकरणानंतरही त्यांच्या पदावर कायम राहतील. करारानुसार सोनी पिक्चर्स विलीनीकृत कंपनीमध्ये १.५७५ अब्ज डॉलर ची गुंतवणूक करेल. गुंतवलेले भांडवल व्यवसाय वाढीसाठी वापरले जाईल. नव्या कंपनीत झी एंटरटेनमेंटचे भागधारक ४७.०७ टक्के आणि सोनी पिक्चर्स नेटवर्क ५२.९३ टक्के असतील.
नव्या कंपनीतील हिस्सेदारी कशी असणार?
- झी एंटरटेनमेंटच्या सोनीतील विलीनीकरणानंतर कंपन्यांमधील भागिदारी स्वरुपातही अनेक बदल होणार आहेत.
- यानंतर ZEELच्या भागधारकांचा वाटा आहे त्या स्थितीत नव्या कंपनीत ६१.२५% असेल.
- मात्र, सोनीद्वारे नियोजित १५७५ दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीनंतर भागभांडवलाची रचना बदलली जाईल.
- या गुंतवणूकीनंतर, ZEEL च्या गुंतवणूकदारांचा हिस्सा सुमारे ४७.०७% असेल आणि सोनी पिक्चर्सच्या भागधारकांचा हिस्सा ५२.९३% असेल.
‘झी’ आणि ‘सोनी’चे काय ठरलं?
- ZEEL आणि SPNI दरम्यान एक विशेष नॉन-बाइंडिंग टर्म शीट ठरवण्यात आली आहे. कराराची अंमलबजावणी पुढील ९० दिवसात पूर्ण केली जाईल.
- विद्यमान प्रवर्तकांना म्हणजे झीला आपली हिस्सेदारी ४ टक्क्यांवरून २० टक्के करण्याचा पर्याय असेल. मंडळावरील बहुसंख्य संचालकांना नामांकित करण्याचा अधिकार सोनी समूहाकडे असेल.