मुक्तपीठ टीम
निसर्ग आपल्याला खूप काही देत असतो, याची जाणीव ठेवत, निसर्गाचं देणं म्हणून प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावलं पाहिजे. याबाबतची सजगता वाढत असल्यामुळे दरवर्षी लाखो नागरिक पर्यावरण रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी वृक्षारोपण करतात. पण कोरोनाच्या काळात अनेकांना वृक्षारोपण करता आले नाही. अशांसाठी आता त्यांच्या नावाने रोपटं लावण्याची संधी आली आहे. त्यांना फक्त आपले नाव नोंदवायचे आहे आणि वृक्षारोपण केले जाईल.
शिवसेनेच्या युवासेनेचे पदाधिकारी सिद्धेश कदम आणि शशिकांत ढोरे वृक्षारोपणाची वेगळी संकल्पना घेऊन आले आहेत. दोघांनी उत्तर मुंबईत १०,००० रोपटे लावण्याची मोहीम सुरु केली आहे. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्या वाढदिवसाच्या दिवशी या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. महापौर किशोरी पेडणेकर आणि उपमहापौर सुहास वडकर यांनी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पहिले रोपटे लावून या मोहिमेची सुरूवात केली.
या मोहिमेतील तरुणांना जोडण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असल्याचे सिद्धेश म्हणाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना एक फॉर्म उपलब्ध करुन देण्यात येत आहे, ज्यामध्ये लोकांना फक्त त्यांचे नाव, मोबाइल नंबर, पत्ता आणि जन्मतारीख भरावी लागेल. लोक Bit.ly/Mmission10KTree या लिंकद्वारे स्वतःची नोंदणी करू शकतात. त्यानंतर युवासेनेच्यावतीने त्यांच्या नावाने वृक्षारोपण करण्यात येईल. मग करताय ना ऑनलाईन नोंदणी?