मुक्तपीठ टीम
मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे बरीच वर्षे अध्यक्ष राहिलेले नेते यशवंत जाधव यांची डायरी लिहिण्याची सवय आता शिवसेनेसाठी अडचणीची ठरणार आहे. जाधव आपल्या डायरीत देण्या-घेण्याची नोंद करत असत, असा आरोप आहे. त्यांनी रोख रकमा किंवा भेटींसमोर थेट नावं न लिहिता कोडवर्ड लिहिले असले तरी त्यामुळे शिवसेनेविरोधात वातावरण निर्मिती करण्याची संधी मिळत आहे.
नुकतीच आयकर विभागाने जाधव यांच्या घरी धाड टाकली होती त्यावेळी तिथे ही डायरी सापडली.या डायरीत अनेक भानगडींची रहस्य दडलेली असण्याची शक्यता आहे. त्यातील दोन नवे कोडवर्ड सर्वात लक्षवेधी आहेत. यापूर्वी मातोश्री या कोडवर्डवर भाजपाने शिवसेनेला लक्ष्य केले होते. आता ‘केबलमॅन’ आणि ‘एम ताई’ हे दोन नवे कोडवर्ड पुढे आले आहेत.
त्याचवेळी यशवंत जाधव यांच्याशी संबंधित ४० मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. यात भायखळ्यातील २६ फ्लॅट्स आणि वांद्रे पश्चिममधील ५ कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे.
यशवंत जाधव यांच्याकडे सापडलेल्या डायरीतील स्फोटक रहस्य
- यशवंत जाधव यांच्याकडे सापडलेल्या डायरीत काही कोडवर्ड्स सापडले यातून अनेक गोष्टी समोर येऊ शकतात.
- यामध्ये ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये रोकड आणि ५० लाख रुपये किंमतीचे घड्याळ दिल्याचा उल्लेख होता.
- यानंतर, ‘केबलमॅन’ आणि ‘एम ताई’ अशा दोन व्यक्तींसोबत एक कोटी ७५ लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचंही यातून समोर आले आहे.
- लवकरच मुंबई महापालिका निवडणुका आहेत त्यामुळे त्यांच्या मालमत्तांच्या जप्तीमुळे निवडणुकीवेळी त्यांना समस्या उद्भवू शकतात.
- निवासी इमारतीतील भाडेकरु हक्क संपादन करण्यासाठी सुमारे १० कोटी रोख दिले.
- गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला २ कोटींचे पेमेंट केले, ‘मातोश्री’ला ५० लाखांचे घड्याळ पाठवले, असा उल्लेख आहे.त्याबद्दल जाधवांनी तो त्यांच्या आईचा उल्लेख असल्याचे म्हटले आहे.
कंपन्यांविरोधातील तक्रारींमुळेही जाधव अडचणीत येण्याची शक्यता!
केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने मुंबई पोलिसांना पत्र लिहून जाधव प्रकरणात गुन्हा नोंदवण्यासाठी लेखी तक्रार दिली आहे. हे पत्र ४ एप्रिलला मरिन ड्राईव्ह पोलिसांना देण्यात आले आहे. या तक्रारीत जाधव यांचे नाव नसले तरीही या सगळ्या कंपन्या जाध
व यांच्याशी संबंधित असल्याचे केंद्र सरकारच्या कॉर्पोरेट कार्य मंत्रालयाने म्हटले आहे. जाधव यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या तपासामध्ये या कंपनीने केलेले गैरव्यवहार समोर आले आहेत.