मुक्तपीठ टीम
केंद्र सरकारवर फोन टॅपिंग करून हेरगिरी केल्याचा आरोप काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी संसदेत केला मात्र याप्रकरणी कोणताही फोन टॅपिंग केला नसल्याचे वारंवार केंद्र सरकारने सांगितलं. पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कोणतेही फोन टॅपिंग झालं नसल्याचा दावा केंद्राने केला असला तरीही भाजपाचेच नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी थेट ट्विट करत भाजपाची आणि केंद्र सरकारची पोलखोल केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने आता सत्य लपवण्याऐवजी सर्वांसमोर उघड करावे, अशी मागणी काँग्रेस नेत्या आणि महिला बाल विकास मंत्री अॅड यशोमती ठाकूर यांनी केली आहे.
जर लपवण्यासारखं काही नाही तर मोदी यांनी इस्रायलला विचारून पेगॅसस प्रकरणी कोणाला पैसे दिले याची माहिती घ्यावी आणि ती उघड करावी असं आव्हानच सुब्रमण्यम स्वामी यांनी केंद्र सरकारला दिले आहे. भाजपच्या सुब्रमण्यम स्वामी यांनी ही मागणी केल्याने केंद्र सरकार लपवाछपवी करते आहे हे स्पष्ट झाले.
सुब्रमण्यम स्वामी यांच्या मागणीचा भाजपाने तातडीने विचार करून देशासमोर सत्य उघड करावे. स्वामी यांनी मागणी केल्याने आता सुंठीवाचून खोकला गेला असे म्हणावे लागेल अन्यथा काँग्रेस किंवा अन्य विरोधी पक्षांनी याबाबत मागणी केली असती तर त्यांच्यावर चॅट राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल करायला सरकारने मागेपुढे पाहिले नसते, असा टोला महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी लगावला आहे