मुक्तपीठ टीम
लेखक, वाचक चळवळीचे कार्यकर्ते आणि टाइम्स ऑफ इंडियाचे ज्येष्ठ मुद्रित शोधक नारायण बांदेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. चार दशकांहून अधिक काळ टाइम्सच्या सेवेत असणाऱ्या बांदेकर यांचे इंग्रजी आणि मराठीवर प्रभुत्व होते. ‘टिळक गेले तेव्हा’ आणि ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची वचने’ अशी पुस्तके लिहिणाऱ्या बांदेकर हे वाचक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते होते.
मोठ्या प्रमाणावर वाचक वर्ग तयार व्हावा यासाठी ग्रंथालीच्या माध्यमातून शेवटपर्यंत त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विशेष म्हणजे पत्रकारांनी बातमीदारी करताना आपल्या अनुभवांच्या आधारे पुस्तके लिहायला हवीत आणि मुख्य म्हणजे पत्रकारांचा हात सतत लिहिता असला पाहिजे, असा त्यांचा आपुलकीचा आग्रह असायचा. प्रत्यक्ष भेटून ते प्रोत्साहित करायचे. ‘आपलं महानगर’ मध्ये कामगार विषयाशी संबंधित त्यांनी सलग पाच वर्षे स्तंभलेखन केले. याशिवाय इतर वर्तमानपत्रांमध्ये ते सतत साहित्य, सामाजिक आणि कामगार विषयक लिखाण करत राहिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा गावी जन्म झालेल्या बांदेकर यांचे बालपण अतिशय हलाखीच्या परिस्थितीत गेले. मात्र अतिशय जिद्दी असलेल्या बांदेकरांनी घरोघरी वर्तमानपत्रे टेकवून आणि मिळेल ते काम करून एमएपर्यंत शिक्षण केले आणि टाइम्सच्या सेवेत त्यांना संधी मिळाली. हसतमुख बांदेकर यांना दुसऱ्यांच्या मदतीला धावून जाण्यात मोठा आनंद मिळे. ज्येष्ठ सदस्य म्हणून मराठी पत्रकार संघाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.