मुक्तपीठ टीम
सिडनीमध्ये झालेला तिसरा कसोटी सामना अर्निर्णित राखण्यात भारतीय संघाला यश आले. ऑस्ट्रेलियाने भारतासमोर ४०७ धावांचे आव्हान दिले होते. त्या आव्हानाचा पाठलाग करताना १०३ षटकांचा सामना करत भारतीय संघाने पाच खेळाडूंच्या मोबदल्यात ३३४ धावापर्यंत मजल मारली. हनुमा विहारी आणि अश्विन यांनी तब्बल २५९ चेंडू खेळत भारताचा पराभव टाळला. त्यामुळे भारतीय संघानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपलं आव्हान कायम ठेवले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्यासाठी भारताला यापुढील कसोटी सामन्यांत विजय मिळवणे आवश्यक आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही भारताची पाचवी मालिका आहे. सिडनी कसोटी सामन्यानंतर आयसीसीने कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे गुण आणि क्रमवारी जाहीर केली आहे.
आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानी आहे. तर भारत दुसऱ्या तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानी विराजमान आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत प्रत्येकी ८-८ असे सामने जिंकले आहेत. भारताच्या खात्यात ४०० तर ऑस्ट्रेलियाच्या खात्यात ३३२ गुण आहेत. गुणांमध्ये तफावत असल्यानेही डब्लूटीसीच्या गुणांमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानी पोहचले आहे. तर भारतीय संघ दुसऱ्या स्थानी आहे. तसेच न्यूझीलंडच्या नावे ४२० गुण असूनही हा संघ तिसऱ्या स्थानी आहे.
दरम्यान, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडमध्ये पहिल्या दोन स्थानासाठी टक्कर असणार आहे. भारतापेक्षा न्यूझीलंड ०.२ गुणांनी मागे आहे. त्यामुळे आता भारताचा ऑस्ट्रेलियाबरोबर असणाऱ्या सामन्यातून अव्वल स्थान कोण पटकावेल हे सिद्ध होणार असून सगळ्यांचे या सामन्याकडे लक्ष लागले आहे.