यमुना एक्स्प्रेस वे मार्गे नोएडा ते दिल्ली दरम्यान मथुरा-आग्रा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही दिवसांनी जगातील श्री कृष्णाची सर्वात उंच मूर्ती पाहायला मिळणार आहे. श्री कृष्णाच्या १०८ फूट उंच मूर्तीचे बांधकाम उत्तरप्रदेशातील गौर यमुना शहरात होत आहे. केवळ आशियातच नव्हे तर संपूर्ण जगात श्री कृष्णाची सर्वात उंच मूर्ती असेल असा दावा केला जात आहे. जमिनीपासून या मुर्तीची उंची १३५ फूट असेल. सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करून मूर्ती तयार केली जात आहे. जन्माष्टमीला मूर्तीची स्थापना आणि मंदिराचे उद्घाटन करण्याची तयारी सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या अयोध्यामध्ये भव्य राम मंदिर बांधले जात आहे. भगवान रामची ही मूर्ती जगातील सर्वात उंच मूर्ती असेल.
या मूर्तीचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे. मूर्तीची निर्मिती राजस्थानमधील कारागीर करत आहेत. मूर्ती तयार करण्यासाठी काँक्रीट आणि प्लास्टरचा वापर केला जात आहे, जेणे करू मूर्ती भक्कम बनेल. मूर्ती वेदर-प्रूफ पेंटने रंगवली जाणार आहे. यामुळे कोणत्याही ऋतूत मूर्ती खराब होणार नाही.
याबाबत गौर समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज गौर म्हणाले की, मूर्ती १३५ फूट उंच असल्यामुळे मथुरा आणि वृंदावन येथे एक्सप्रेस वेने प्रवास करणाऱ्या लोकांसाठी ही मूर्ती आकर्षण ठरणार आहे. या परिसरात गौर यमुना सिटी टाउनशिप देखील आहे. अशा परिस्थितीत लोकांना टाउनशिपमध्ये मथुरा वृंदावनसारखी पवित्र ठिकाणेही अनुभवायला मिळतील. श्रीकृष्णाचे दर्शन घेण्यासाठी मथुरा येथे मोठ्या संख्येने लोक येतात. अशा परिस्थितीत या मूर्तीच्या निर्मितीमुळे या भागाला नवीन ओळख मिळेल.
जयपूरचे शिल्पकार विष्णू प्रकाश शर्मा यांनी या मूर्तीची रचना केली आहे. आता ही मूर्ती त्यांच्या आणि श्यामा मूर्ती यांच्या देखरेखीखाली तयार करण्यात आली आहे. जयपूरचे हे शिल्पकार देवतांच्या मूर्ती आणि महापुरुषांच्या मूर्ती बनवतात.