मुक्तपीठ टीम
आजचा शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबरचा दिवस खूपच वेगळा असणार आहे. त्यादिवशी लसीकरण हे लेडिज स्पेशल आहे. मुंबईकरांना लेडिज स्पेशल लोकल किंवा बसती सवय आहेच, पण आता त्यांना लसीकरण केंद्राचीही सवय होईल. शुक्रवारी मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोरोना लसीकरण आयोजित करण्यात आले आहे. यामुळे जर लसीकरणात महिलांचा टक्का कमी असेल तर तो वाढण्यास मदत होईल.
मुंबईत लेडिज स्पेशल लसीकरण
- सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंत होणार लसीकरण
- थेट लसीकरण केंद्रावर येवून महिलांना घेता येईल पहिला आणि दुसरा डोस
- फक्त महिलांना लस दिली जाणार असल्याने ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद राहणार आहे.
कोरोना प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने शुक्रवारी (दिनांक १७ सप्टेंबर २०२१) सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.३० या वेळेत, मुंबईतील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड-१९ लसीकरण केंद्रांवर फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष लसीकरण सत्र राबवले जाणार आहे. ह्यात महिलांना थेट लसीकरण केंद्रावर येवून कोविड लसीची पहिली किंवा दुसरी मात्रा देखील घेता येणार आहे. ह्या विशेष सत्राच्या कारणाने उद्यासाठीची ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात येणार आहे.
कोरोना विषाणू प्रतिबंधक लसीकरण अधिकाधिक वेगाने आणि सर्व स्तरातील नागरिकांपर्यंत नेण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका देखील प्रयत्नशील आहे. त्यासाठी विशेष सत्र राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून फक्त महिलांसाठी राखीव असे विशेष कोविड लसीकरण सत्र आज शुक्रवार दिनांक १७ सप्टेंबर २०२१ रोजी सायंकाळी ६.३० पर्यंत राबवले जाणार आहे.
मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमधील लसीकरण केंद्र आणि त्यासोबत सर्व शासकीय व महानगरपालिका रुग्णालये आणि कोविड सेंटर येथील लसीकरण केंद्रावर थेट येवून (वॉक इन) महिलांना कोविड लस घेता येणार आहे. पहिली किंवा दुसरी मात्रा देखील ह्या सत्रात दिली जाणार आहे. फक्त महिलांना लस दिली जाणार असल्या कारणाने, शुक्रवारी यासाठीची प्रचलित ऑनलाइन पूर्व नोंदणी बंद ठेवण्यात आली आहे.