मुक्तपीठ टीम / पालघर
पालघर जिल्ह्यात महिला व बाल हक्क कल्याण समिती दौऱ्यातील ४ महिला आमदारांनी जव्हार तालुक्याला भेट देऊन या भागातील महिलांच्या समस्या,महिलांसाठीच्या योजना व सोयी सुविधांची पाहणी केली. या समितीकडून संपूर्ण पालघर जिल्हा दौरा होणार आहे. या साठी दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत त्यापैकी जव्हारसाठी दुसऱ्या क्रमांकाची टीम आली असून त्यात आमदार मनीषा कायंदे,आमदार लता सोनवणे,आमदार मंजुळा गावित,आमदार गीता जैन यांचा समावेश आहे. दौऱ्याच्यावेळी या समितीने जव्हारमधील मध्यवर्ती स्वयंपाक गृहाची स्तुती केली.
महिला व बाल हक्क कल्याण समिती दौऱ्यात समितीने प्रगती प्रतिष्ठानची कर्णबधीर शाळा,कुटीर रुग्णालय , जामसर प्राथमिक आरोग्य केंद्र, भरसटमेट अंगणवाडी, विनवळ आश्रमशाळा व मध्यवर्ती स्वयंपाक गृह, प्राथमिक शाळा वाळवंडा,अंगणवाडी वाळवंडा, ग्रामपंचायत रायतळे कातकरी समाजाचे आदिम आवास योजना वसाहत, साखरशेत आश्रमशाळा,प्राथमिक आरोग्य केंद्र वरफपाडा शाळा , अंगणवाडी या ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्यात आली.
जव्हारच्या मध्यवर्ती स्वयंपाक गृहाबद्दल चांगलं मत!
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत, स्त्री शक्ती संस्थेच्या माध्यमातून विंनवळ येथे चालविण्यात येणाऱ्या मध्यवर्ती स्वयंपाक गृहाचा संपूर्ण आढावा या समितीने घेतला. या स्वयंपाक गृहातून जव्हार प्रकल्प अंतर्गत २९ आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना भोजन पुरवठा करण्यात येतो. या स्वयंपाकगृहातून योग्य आणि सकस आहार आश्रम शाळेतील विद्यार्थ्यंना मिळत असल्याचे मत समितीने पाहणी दरम्यान व्यक्त केले. या स्वयंपाक गृहाच्या व्यवस्थापिका सुवर्णा पाटील यांनी मध्यवर्ती स्वयंपाक गृहाच्या कार्यपद्धतीची संपूर्ण माहिती दिल्यानंतर समितीने समाधान व्यक्त केले.
पाहा व्हिडीओ: