मुक्तपीठ टीम
जबरदस्त आत्मविश्वास…जबरदस्त इच्छाशक्ती…जबरदस्त लढाऊ वृत्ती…असं सारं एकवटलेलं असलं तर अशक्य काही नसतं. कोरोना कितीही भयंकर वाटू द्या, पण ठरवलं तर हरवणं आणि जीवन जिंकणं अशक्य नाही. नागपूरच्या स्वप्ना रसिक यांनी हे दाखवून दिलं आहे.
स्वप्ना रसिक यांचं ३५ वर्ष. त्या कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर तब्बल ४५ दिवस त्यांनी कोरोनाविरूद्ध लढा दिला. या ४५ दिवसांत त्या २५ दिवस व्हेंटिलेटरवर होत्या. अखेर त्यांनी कोरोनासोबतची लढाई जिंकली आणि आपल्या पाच वर्षांच्या लेकीची भेट घेतली.
स्वप्ना यांच्या शब्दात सांगायचे तर, “मी माझी मुलगी लोरिनाबद्दल विचार करत रहायची. त्यातूनच मला प्रेरणा मिळाली आणि शेवटी मी वाचले.” स्वप्नावर उपचार करणार्या डॉक्टरांनी असेही सांगितले की, जेव्हा जेव्हा स्वप्नाला शुद्ध येत असे तेव्हा ती फक्त आपल्या मुलीबद्दलच बोलायची आणि तिची विचारपूस करायची.
स्वप्ना १९ एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह झाली होती. २४ एप्रिलला जेव्हा तिची प्रकृती चिंताजनक बनली तेव्हा तिला रुग्णालयात दाखल केले असता, तिच्या दोन्ही फुफ्फुसात संसर्ग पसरला होता. त्याचा एसपीओ २ ची पातळी ८० पेक्षा कमी होती आणि ती ठीकही होत नव्हती.
स्वप्नावर उपचार करणारे डॉ. परिमल देशपांडे म्हणाले की, “ऑक्सिजन थेरपी असूनही, तिचा एसपीओ २ सुधारत नव्हता. म्हणूनच, तिला व्हेंटिलेटर लावण्याशिवाय आमच्याकडे पर्याय उरला नाही. हे व्हेंटिलेटर १०० टक्के क्षमतेसह २५ दिवस वापरले गेले.” डॉक्टर म्हणाले की, ही नक्कीच एक दुर्मीळ बाब आहे. व्हेंटिलेटरवर २५ दिवस राहिल्यानंतर कोणत्याही व्यक्तीचे लवकर बरे होणे खूप कठीण आहे.
डॉक्टर अशोक अर्बत म्हणाले की, त्यांचे एकमेव उद्दीष्ट स्वप्नाला वाचविणे हे होते. स्वप्नाचा पती आशिष जो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. रुग्णलयामधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर स्वप्नाला पुढचे सात दिवस होम क्वारंटाईन राहण्यास सांगितले. त्यानंतर ती तिच्या मुलीला भेटली.