मुक्तपीठ टीम
देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या विप्रो कंपनीने कोरोना संकटाच्या कालावधीतच दुसऱ्यांदा कर्मचार्यांचे पगार वाढवले आहेत. याआधी टीसीएसने अशी एका वर्षातील दुसरी पगारवाढ दिली होती. विप्रोनेही आता पुन्हा एकदा पगारवाढ जाहीर केली. या वेतनवाढीचा फायदा कंपनीतील जवळपास ८०% कर्मचार्यांना होईल. ही पगारवाढ १ सप्टेंबर २०२१ पासून लागू होईल. २०२१ या वर्षात विप्रोने दुसऱ्यांदा पगार वाढविला आहे.
कंपनीच्या घोषणेनुसार, ही वेतनवाढ बँड ३ पर्यंतच्या कर्मचार्यांना लागू होईल. या बँडमध्ये सहाय्यक व्यवस्थापक आणि त्यानंरचे कर्मचारी समाविष्ट आहेत. यापूर्वी जानेवारी २०२१ मध्येही कंपनीने बँड ३ पर्यंतच्या ८०% कर्मचार्यांचे पगार वाढवण्याची घोषणा केली होती.
विप्रो कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, सी १ बँडच्या पात्र कर्मचार्यांना जूनपासून वाढवलेले वेतन सुरू होईल. या बँडमध्ये व्यवस्थापक आणि त्यावरील कर्मचार्यांचा समावेश आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या बँडमधील ऑफशोअर कर्मचाऱ्यांची सरासरी पगारवाढ हाय सिंगल अंकात करण्यात आली आहे. तर ऑनसाइट कर्मचार्यांच्या पगारात, मिड सिंगल अंकात वाढ झाली आहे. कंपनीने म्हटले आहे की, चांगली कामगिरी करणाऱ्या कर्मचार्यांना वेतन वाढीसह रिवॉर्डही देण्यात येईल.
एका वर्षात पुन्हा पगार वाढवणारी दुसरी कंपनी
- एका वर्षात दुसऱ्यांदा पगार वाढवणारी विप्रो ही देशातील दुसरी कंपनी बनली आहे.
- मागील वर्षाच्या सुरुवातीला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) दोनदा पगार वाढवण्याची घोषणा केली होती.
- टीसीएसने आर्थिक वर्ष २०२१ आणि एप्रिल २०२१ च्या तिसर्या तिमाहीत पगार वाढवण्याची घोषणा केली होती.
- टीसीएसने ६ महिन्यांचे अंतर ठेवत पगार वाढविला. ५. टीसीएस कर्मचार्यांच्या वेतनात ६ महिन्यांच्या कालावधीत १२ ते १४% वाढ झाली आहे.