मुक्तपीठ टीम
२६ नोव्हेंबरचा दिवस मुंबईकर आणि संपूर्ण देशासाठी काळा दिवस आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याला आज १४ वर्षे पूर्ण झालेत. मुंबई हल्ल्याने संपूर्ण जग हादरलं होतं. दहशतवाद्यांनी मुंबईची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला केला होता, ज्यात १६०हून अधिक निरपराधांचे प्राण गेले होते. या हल्ल्यात पोलिसांनीही आपले प्राण गमावले. आपल्या गावाचं नामकरण राहुल नगर असं करून या हल्ल्यात शहीद झालेले हवालदार राहुल शिंदे यांना त्यांच्या गावतल्या लोकांनी एक अनोखी श्रद्धांजली वाहिली आहे.
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले राहुल शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या गावातील लोकांनी गावाचे नाव बदलले आहे. महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील सुलतानपूर गाव आता राहुल नगर म्हणून ओळखले जाणार आहे. राहुल हे महाराष्ट्राच्या राज्य राखीव पोलीस दलात (SRPF) हवालदार होते.
कोण होते राहुल शिंदे?
- राहुल शिंदे हे सोलापूर जिल्ह्यातील सुलतानपूर गावाचे, सुपुत्र होते.
- राहुल शिंदे हे महाराष्ट्राच्या पोलीस दलात हवालदार होते.
- मुंबईच्या २६/११ दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिकारात त्यांचे मोलाचे योगदान होते.
- ताज हॉटेलला दहशतवाद्यांपासून मुक्त करण्यासाठी प्रवेश करणारे ते पहिले पोलीस हवालदार होते.
- हॉटेलमध्ये प्रवेश करताच त्यांची दहशतवाद्यांशी चकमक झाली.
- त्यांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला.
- राहुल यांना त्यांच्या सर्वोच्च बलिदानासाठी राष्ट्रपती पोलीस पदक प्रदान करण्यात आले.
राहुल शिंदेंच्या स्मरणार्थ त्यांच्या गावात स्मारक…
- मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या १० लाखांच्या निधीतून राहुल यांचे स्मारक उभारण्यात आले आहे.
- आज हल्ल्याच्या १४ व्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला, त्यांच्या गावाचे नाव बदलून राहुल नगर असे करण्यात येणार आहे.
- यासाठी सर्व औपचारिकता पूर्ण करण्यात आली आहे.
- त्यांच्या बलिदानाला सन्मान देण्यासाठी हे मोठे पाऊल आहे.
- या निर्णयामुळे संपूर्ण गाव आनंदी आहे.
२६/११ मुंबई दहशतवादी हल्ला
- २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता.
- २००८ मध्ये पाकिस्तानमधून दहा दहशतवादी समुद्राच्या मार्गे मुंबईत घुसले होते.
- मुंबईच्या ताज हॉटेलसह सहा ठिकाणी हल्ला करण्यात आला होता.
- या हल्ल्यात भारतीयांसह अनेक परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला होता.
- लष्कर ए तोयबाच्या या अतिरेक्यांनी हा हल्ला केला होता.
- या हल्ल्यात १६० हून अधिक निरपराधांचे प्राण गेले होते.
- आज या हल्ल्याला १४ वर्षे पूर्ण झाले .