मुक्तपीठ टीम
ऑक्टोबर हिटमुळे सध्या मुंबईत प्रचंड उकाडा होत आहे. त्यामुळे होत असलेल्या घालमेलीबद्दल केवळ वातावरण बदलास (क्लायमेट चेंज) दोष देऊन चालणार नाही. तर वेगाने होत असलेल्या शहरीकरणाच्या जोडीनेच अशाश्वत विकास आणि हरित आच्छादन कमी होणे यामुळे गेल्या तीन दशकांमध्ये मुंबईकरांना वाढत्या तापमान तीव्रतेला तोंड द्यावे लागत आहे. गेल्या तीन दशकात बांधकाम क्षेत्रफळात ६६ टक्के वाढ झाल्यामुळे मुंबईत उष्म्याचा वाढता ताण सहन करावा लागत आहे. १९९१ ते २०१८ दरम्यान जमीन वापराच्या पद्धतीत झालेला बदल आणि ‘अर्बन हिट आयलॅण्ड इफेक्ट’ यामुळे मुंबईचे तापमान सरासरीपेक्षा दोन अंश सेल्सिअसनी वाढल्याचे तीन संस्थांमधील संशोधकांच्या अभ्यासातून निष्पन्न झाले आहे.
मुंबईने १९९१ ते २०१८ या काळात ८१ टक्के मोकळ्या जागा (झाडे-झुडपे नसलेल्या ओसाड जागा), ४० टक्के हरित आच्छादन (जंगल आणि झुडपे असलेली जमीन) आणि सुमारे ३० टक्के जल क्षेत्र (तळी, डबकी, पूरक्षेत्र) गमावल्याचे नुकत्याच झालेल्या अभ्यासातून दिसून येते. मात्र याचवेळी बांधकाम क्षेत्रफळात ६६ टक्क्यांनी वाढ झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळेच २७ वर्षांत मुंबईच्या तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने वाढ झाली असल्याचा निष्कर्ष या अभ्यासात मांडला आहे.
नवी दिल्ली येथील जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ येथील नॅचरल सायन्सेसच्या फॅकल्टी, उस्मानिया विद्यापीठ, हैदराबाद आणि अलिगड मुस्लिम विद्यापीठ, उत्तरप्रदेश येथील अभ्यासकांच्या ‘अर्बन हिट आयलॅण्ड डायनामिक्स इन रिस्पॉन्स टू लॅण्ड-युज/लॅण्ड-कव्हर चेंज, इन द कोस्टल सिटी ऑफ मुंबई’ (Urban Heat Island Dynamics in Response to Land-Use/Land-Cover Change in the Coastal City of Mumbai) या अभ्यासातून हे मांडण्यात आले आहे. हा अभ्यास ‘इंडियन रिमोट सेन्सिंग जर्नल’ या पीअर रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. शहरीकरणाचा सध्या असलेला वाढता वेग आणि जमिनीच्या वापरात पूर्णपणे परिवर्तन करणे यामुळे पुढील काळात मुंबईत ‘अर्बन हिट आयलॅण्ड’ची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता या अभ्यासात मांडली आहे.
‘अर्बन हिट आयलॅण्ड इफेक्ट’ या मायक्रो-क्लायमेटिक घटनेमुळे शहरात तीव्र उष्म्याची जाणीव होते. यामागे अनेक कारणे असून, बांधकामामध्ये वापरली जाणारी काँक्रिटसारखी साधनसामग्री हे सर्वात प्रमुख कारण असल्याचे, जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या भूगोल विभागातील नॅचरल सायन्सेसचे फॅकल्टी प्रो. अतिकूर रहमान यांनी स्पष्ट केले.
“यामुळे शहरातील उष्णतेसंबंधीचे वातावरण अधिक बिघडणार आहे, तसेच शहरातील रहिवाशांच्या आरोग्यविषयक धोक्यात गंभीर वाढदेखील होईल,” प्रो. रहमान म्हणाले. “मुंबईतील उष्म्यात होत असलेल्या वाढीचा संबंध हा शहराचे हरित आच्छादन कमी होण्याशी असून, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खूप मोठ्या प्रमाणात हरित आच्छादनाचे, बांधकाम क्षेत्रात होत असलेल्या परिवर्तनाचा हा परिणाम आहे,” असे त्यांनी नमूद केले.
अभ्यास कसा केला?
उपग्रहाधारीत प्रतिमांचा (युएसए-नासा लॅण्डसॅट डेटासेट्स खुले उपलब्ध आहेत) वापर करत अभ्यासकांनी मुंबई शहर आणि उपगनरांतील एकूण ६०३ चौरस कि.मी. प्रदेशाचा अभ्यास केला. ज्यामध्ये १९९१ ते २०१८ या काळातील जमीन-वापर आणि जमीन-आच्छादनातील बदल, कमाल, किमान आणि सरासरी तापमानातील फरक (अर्बन हिट आयलॅण्ड तीव्रतेसाठी), जमिनीचे पृष्ठभागावरील तापमान, झाडे-झुडपांच्या आच्छादनातील बदल विरुद्ध शहरी बांधकाम घनता या बाबींचा अभ्यास झाला. हाती आलेले निष्कर्ष हे हाय रिझोल्युशन नकाशांद्वारे मांडण्यात आले. (ग्राफीक्स पाहावे)
निष्कर्ष : ‘वेगवान अनियंत्रित शहरीकरण हे संकटाचे मूळ कारण’
शहाफहाद, वरिष्ठ संशोधक फेलो भूगोल विभाग, जामिया इस्लामिया विद्यापीठ आणि शोधनिबंधाचे मुख्य लेखक म्हणाले, “गेल्या पाच-सहा दशकांपासून वेगवान अनियंत्रित शहरीकरण आणि अधिक चांगल्या आर्थिक संधी यामुळे मोठी लोकसंख्या शहरांकडे आकर्षित होत आहे. त्यामुळे हरित आच्छादन, झाडेझुडपांच्या जागा, पाणथळ जागा आणि मोकळ्या जमिनी अशा नैसर्गिक जागांच्या वापर पद्धतीत परिवर्तन होत असून शहराचे बांधकाम क्षेत्रफळ मोठ्या प्रमाणात वाढले आहे.”
१९९१ ते २०१८ या दरम्यान मुंबईने जंगल, झाडेझुडपे असलेली सुमारे ४० टक्के हरित आच्छादनाची जमीन गमावली आहे असे हा अभ्यास नमूद करतो. १९९१मध्ये २८७.७६ चौरस कि.मी. असलेला हा भूभाग २०१८ मध्ये केवळ १९३.३५ चौरस कि.मी. इतका कमी झाला.
१९९१ मधील उपलब्ध मोकळ्या जमिनीचे क्षेत्रफळ ८०.५७ चौरस कि.मी. होते ते २०१८ मध्ये ३३.७ चौरस कि.मी.वर आले. तसेच याच काळात जलक्षेत्रेदेखील कमी झाली असून ती २७.१९ चौरस कि.मी.वरुन २०.३१ चौरस कि.मी. इतकी झाली आहेत.
मोकळ्या जमिनी, हरित आच्छादन आणि जलक्षेत्राचे रुपांतर बांधकाम झालेल्या जागांमध्ये होताना १९९१ मध्ये १७३.०९ चौरस कि.मी. असेलेले हे क्षेत्र २०१८ मध्ये जवळपास दुपटीपर्यंत म्हणजेच ३४६.०२ चौरस कि.मी. इतके वाढले आहे.
भूभागावर झालेले हे परिवर्तन जमिनीच्या पृष्ठभागावरील तापमानाला आणि अर्बन हिट हायलॅण्ड तीव्रतेला चालना देण्यात परिणामकारकरित्या बदल करणारे आहे. “१९९१ मध्ये सरासरी तापमान हे ३४.०८ अंश सेल्सिअस इतके होते. ते २०१८ मध्ये हिट आयलॅण्ड क्षेत्रात (संवेदनशील भाग) ३६.२८ अंश सेल्सिअस इतके वाढले (२.२ अंश सेल्सिअसची वाढ). ज्यामुळे वाढलेल्या उष्म्याच्या धोक्यांना रहिवाशांना सामोरे जावे लागणार एक्सपोज आहे,” शहाफहाद म्हणाले.
उष्म्यावर मात कशी करायची?
धोरणकर्ते आणि शहर नियोजनकारांसाठी या अभ्यासाचे निष्कर्ष उपयोगी पडतील. अर्बन ग्रीन स्पेस स्पेशिअल प्लानिंग आणि अर्बन हिट आयलॅण्डचे धोके कमी करण्याची धोरणे ठरविण्यासाठी याचा लाभ होईल.
वाढत्या उष्म्याचा धोका कमी करण्यासाठी शहरातील हरितकरणास तातडीने प्रोत्साहन द्यायला हवे. त्यासाठी अगदी प्रभाग, गल्ली असे सूक्ष्म पातळीवर प्रयत्न करायला हवेत. घरांच्या गच्चीवरील बगिचा वाढविणे तसेच उंच इमारतींसाठी काचांचा वापर टाळण्यास उद्युक्त करणे असे उपाय करावे लागतील, असे अभ्यासक म्हणाले.
“मुंबईतील मोकळ्या जागा कमी असल्या तरी, जिओस्पेशिअल टेक्निक्सचा (geospatial techniques) वापर हा हरित जागा आणि जलक्षेत्रे शोधणे आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी परिणामकारक ठरेल,” असे शहाफहाद म्हणाले.
अर्बन हिट आयलॅण्ड तीव्रतेत वाढ होण्यामुळे युरोप आणि उत्तर अमेरिकेत मृत्युदरात वाढ झाल्याचे नमूद करताना प्रो. रहमान यांनी अधिक माहिती दिली. ते म्हणाले, “त्यामुळे निर्णयकर्त्यांनी तातडीने नागरिकांच्या आरोग्यावरील संभाव्य परिणामांची जाणीव ठेवत, उष्म्याच्या तीव्रतेवर मात करण्यासाठी हरित आच्छादन वाढविण्याची गरज आहे.”
अभ्यासकांच्या महत्वाच्या शिफारशी
विकसनशील अशा भागातील जमिनीच्या वापराचे योग्य नियोजन. मुख्यत: उपनगर जिल्ह्यात ‘अर्बन हिट आयलॅण्ड’च्या तीव्रता वाढीचे अनुभव येत आहेत अशा ठिकाणी.
आरोग्यदायी जीवनासाठी शहरी भागात प्रति व्यक्ती नऊ चौरस मीटरचे हरित क्षेत्र या जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) शिफारशीचा वापरता येईल. याबाबत युरोपियन युनियनने (इयु) युरोपियन देशांतील शहरांसाठी २६ चौरस मीटरचे निकष घालून दिले आहेत.
त्याचबरोबर नागरिक अर्बन हिट आयलॅण्ड तीव्रतेवर मात करण्यासाठी गच्चीवरील बगिचा, व्हर्टिकल गार्डनिंग आणि सार्वजनिक स्तरावर वृक्षारोपण अशा कामांद्वारे यामध्ये मदत करु शकतात.
तज्ज्ञांचा दृष्टीकोन आणि शिफारशी
डॉ. (वास्तूविशारद) रोशनी उद्यावार येहुदा, प्रेसिडेंट, इन्स्टिट्यूट ऑफ एन्व्हॉयरमेन्टल आर्किटेक्ट अॅण्ड रिसर्च – आयइएआर.
इमारत बांधणीमध्ये काँक्रिट, स्टील आणि काच या साधनसामग्रीचा वापर वाढल्यामुळे ‘अर्बन हिट आयलॅण्ड इफेक्ट’चा धोका निर्माण होत आहे. इमारतींच्या जवळजवळ असलेल्या व्हर्टिकल रचनेमुळे वाऱ्याच्या संचारास अडथळा निर्माण होऊन तापमान वाढते. नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागा, हरित जागा नष्ट होत आहेत. शहराच्या विकासयोजनेत ‘हिट आयलॅण्ड’ घटनेचा परिणाम विचारात घेणे आत्यंतिक आवश्यक आहे.
गच्चीवरील बगिचा, शीतल छत आणि छतावरील शहरी शेती अशा बाबींना आर्थिक प्रोत्साहन द्यायला हवे जेणेकरुन अर्बन हिट आयलॅण्डची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. कोणत्याही बांधकाम प्रकल्पात झाडे तोडल्यानंतर भरपाई म्हणून अन्यत्र कोठेतरी वनीकरण करण्यापेक्षा शहरातच वृक्षांचे पुनर्रोपण करण्यास प्रोत्साहन द्यावे लागेल.
अक्षय देवरस, इंडिपेन्डन्ट मेटरोलॉजिस्ट अॅण्ड पीएचडी स्टुडन्ट अॅट द युनिव्हर्सिटी ऑफ रिडिंग इन इंग्लंड
आरोग्यावर होणारा परिणाम याचा विचार इतर पर्यावरणीय समस्यांबाबत केला जातो तसा अर्बन हिट आयलॅण्ड इफेक्टबाबत फारसा केला जात नाही. शहरातील ठराविक वर्गाला/भागाला अर्बन हिट आयलॅण्ड इफेक्टचा प्रभाव तुलनेने अधिक प्रमाणात पडतो, ही बाब देवरस यांनी ठळकपणे अधोरेखित केली.
अर्बन हिट आयलॅण्ड इफेक्टचा प्रभाव आरोग्यावर होतो. उच्च तापमान आणि आर्द्रता आजारी पडण्यास कारणीभूत ठरते. तापमान आणि आर्द्रता या दोहोंच्या संयुगाद्वारे हिट इंडेक्स मांडला जातो. ऑक्टोबर महिन्यात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसपर्यंत असले तरी हिट इंडेक्स हा ४५ अंश सेल्सिअसपर्यंत जातो. कारण यावेळी आर्द्रतेचे प्रमाण हे ६० टक्क्यापर्यंत पोहचलेले असते.
धारावीसारख्या ठिकाणी असलेल्या दाट लोकवस्तीला अर्बन हिट आयलॅण्ड इफेक्टचा फटका अधिक बसतो. अशा ठिकाणी वाढत्या उष्म्याला तोंड देण्यासाठी पुरेसे वायुविजन आणि इतर सुविधा नसतात. त्याचवेळी उंच इमारती किंवा गेटेड कम्युनिटीजमध्ये अशा सुविधांमुळे उष्म्याचा त्रास कमी करता येतो. पण त्याचा फटका इतर ठिकाणी दुहेरीपणाने सहन करावा लागतो. विशेषत: कामासाठी रोज प्रवास करणारे आणि बाहेरची कामे करणाऱ्यांना हा फटका अधिक बसतो.
अभ्यासक लेखकांचा संपर्क: शोधनिबंधाबाबतच्या प्रश्नांसाठी
Prof. Atiqur Rahman from the Department of Geography, Faculty of Natural Sciences Jamia Millia Islamia: +91 9873115404/arahman2@jmi.ac.in
प्रसिद्धी पत्रकाबाबत माहितीसाठी संपर्क:
सुहास जोशी: +91 9833068140, joshisuhas@gmail.com
इमेज १: मुंबईतील जमीन वापराच्या पद्धतीतील बदल – १९९१ ते २०१८. (स्रोत: ‘अर्बन हिट आयलॅण्ड डायनामिक्स इन रिस्पॉन्स टू लॅण्ड-युज/लॅण्ड कव्हर चेंज इन कोस्टल सिटी ऑफ मुंबई’ (Urban Heat Island Dynamics in Response to Land-Use/Land-Cover Change in the Coastal City of Mumbai)
कृपया ग्राफीक्स पुढील पानावर पाहणे
ग्राफीक्स
इमेज २ : मुंबईत १९९१ ते २०१८ दरम्यान अर्बन हिट लॅण्ड इफेक्ट वाढण्याच्या उपग्रह प्रतिमा (स्रोत: ‘अर्बन हिट आयलॅण्ड डायनामिक्स इन रिस्पॉन्स टू लॅण्ड-युज/लॅण्ड कव्हर चेंज इन कोस्टल सिटी ऑफ मुंबई’ (Urban Heat Island Dynamics in Response to Land-Use/Land-Cover Change in the Coastal City of Mumbai)
इमेज ३: मुंबईच्या जमीन वापर-जमीन आच्छादनातील बदल. १९९१ ते २०१८. (स्रोत: ‘अर्बन हिट आयलॅण्ड डायनामिक्स इन रिस्पॉन्स टू लॅण्ड-युज/लॅण्ड कव्हर चेंज इन कोस्टल सिटी ऑफ मुंबई’ (Urban Heat Island Dynamics in Response to Land-Use/Land-Cover Change in the Coastal City of Mumbai)
(हे प्रसिद्धी पत्रक ‘असर सोशल इम्पॅक्ट अॅडव्हायझर प्रा. लि.’ यांच्या हवा प्रदूषण आणि वातावरण संदर्भातील समस्यांबाबत भारतभर एक ठोस विवरण तयार करण्यासाठी असलेल्या ‘विज्ञान सुलभीकरण’ कार्यक्रमाचा भाग आहे. हवेची गुणवत्ता, त्याचा आरोग्यावरील परिणाम आणि त्यावरील उपाय या संदर्भात नागरिकांमध्ये संवाद सुरु करणे हे याचे उद्दीष्ट आहे. ज्याद्वारे महाराष्ट्रात हवेची गुणवत्ता तसेच क्लायमेट समस्यांबाबत चर्चेने रचनात्मक आकार घ्यावा यासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा भाग म्हणून आम्ही यापूर्वीही वातावरण विषयक संशोधनपर लेख सुलभ करून प्रकाशित केले आहेत आणि यापुढेही हे प्रयत्न सुरू राहतील.)