मुक्तपीठ टीम
शिवसेना खासदार संजय राऊत यांचा ईडी कोठडीतला मुक्काम ८ ऑगस्टपर्यंत वाढला आहे. तर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावलं आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी राऊतांविरोधातील ईडी कारवाईविरोधात जोरदार आवाज उठवला आहे. पण संजय राऊतांवर ज्यांच्याशी असलेल्या अतिजवळीकीमुळे सातत्यानं शिवसेनेतूनही टीका होते, त्या शरद पवार मात्र तुलनेत खूप शांत असल्यानं आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. त्याचवेळी पवारसाहेब जास्त बोलत नाही याचा अर्थ ते राऊतांसाठी त्यांच्या डोक्यात नक्कीच काही असावं, ते काही करत असावेत, असा दावा एका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने म्हटलं.
संजय राऊतांना गांधी परिवारांकडून समर्थन!!
- संजय राऊतांना अटक झाली त्याच दिवशी राहुल गांधीनी ट्वीट करत त्या घटनेचा निषेध केला होता.
- तर प्रियांका गांधी यांनी ट्वीट करत संजय राऊतांना पाठिंबा दर्शवत भाजपावर घणाघाती टीका केली आहे.
- “धमक्या, कपट, फसवेगिरी करून सत्ता बळकावणं आणि लोकशाही चिरडणं हे भाजपाचं एकमेव ध्येय आहे.
- संजय राऊत भाजपच्या फसव्या राजकारणाला घाबरत नसून भाजपाला तोंडघशी पाडल्यानं त्यांच्या कुटुंबावर हल्ला झाला आहे”, असं ट्वीट प्रियांका गांधी केले आहे.
- संजय राऊतांच्या अटकेवरुन राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली.
- राजाचा संदेश स्पष्ट आहे, जो माझ्या विरोधात बोलेल त्याला त्रास सहन करावा लागेल. सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करुन विरोधकांचं धैर्य तोडणं आणि सत्याचा आवाज बंद करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, हुकूमशाहनं हे लक्षात घ्यावं शेवटी सत्याचा विजय होईल आणि अहंकार पराभूत होईल, असं राहुल गांधी म्हणाले.
संजय राऊतांमागील ईडीपिडेवर शरद पवार का शांत?
- संजय राऊत यांच्यावर अटकेची कारवाई झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी ना प्रसार माध्यमांपुढे ना सोशल मीडियावर आपली आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे.
- त्यांनी धुळे, दिल्लीत काहीसं भाष्य केलं, असं सांगितलं जातं. पण ते तेवढेसे आक्रमक दिसलेच नाहीत.
- खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत राज्यसभेत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला.
- तरीही शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस संजय राऊतांच्या अटकेप्रकरणी म्हणावे तेवढे आक्रमक दिसलेच नाहीत, उलट शांतच असल्याचं जाणवले.
- एकंदरीतच ज्या पक्षाचे शुभचिंतक असल्याचा आरोप शिवसेनेतूनही संजय राऊतांवर सातत्यानं होत राहिला, विरोधातील भाजपाच नाही तर सोबतची काँग्रेसही ते राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत का, अशी टीका होत राहिली, त्याच राष्ट्रवादीकडून म्हणावी तशी आक्रमक भूमिका का मांडली जात नसावी, अशी चर्चा सुरु झाली आहे.
- विशेषत: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंसारखाच शरद पवार यांच्याविषयी मनात आदरभाव असल्याचं जाहीर सांगणाऱ्या संजय राऊतांवर ईडी कारवाई झाली असताना शरद पवार यांनी खूपच शांत राहणं आश्चर्यकारक मानलं जात आहे.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका पदाधिकाऱ्याने मुक्तपीठशी बोलताना शरद पवार हे बोलत नसतात, ते करून दाखवतात, असं म्हटलं. ते बोलत नाहीत, याचा अर्थ त्यांचं राऊतांसाठी काही वेगळे प्रयत्न सुरु असतील, असे ते म्हणाले.