मुक्तपीठ टीम
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी ड्रग पार्टी प्रकरणात एनसीबी आणि बीजेपी यांच्यात कनेक्शनचा आरोप केला आहे. त्यासाठी त्यांनी एनसीबीनं सोडलेल्यांपैकी एक रिषभ सचदेवा हा भाजपा नेते मोहित कंबोज उर्फ मोहित भारतीय यांचा मेहुणा असल्यामुळेच दिल्लीच्या आदेशानुसार एनसीबीने त्या तिघांना सोडल्याचा आरोपही केला. मलिकांच्या आरोपांनंतर पुन्हा एकदा मोहित कंबोज हे नाव चर्चेत आले आहे. भाजपाच्या नेत्यांनी खासगीत ‘मुक्तपीठ’शी बोलताना, सातत्यानं भाजपाला वादाच्या भोवऱ्यात ओढणारे मोहित कंबोज आमच्या नेत्यांचे का लाडके आहेत, हे एक न उलगडणारं कोडं असल्याचं म्हटले आहे.
मोहित कंबोज आणि वाद हे न संपणारं नातं आहे, असं भाजपाच्या वर्तुळात बोलले जाते. काही वर्षांपासून ते भाजपा नेत्यांच्या संपर्कात आले आणि खूपच घनिष्ठ नातं जुळवण्यात यशस्वी झाले. अनेकदा स्वत:च्या प्रतिमेसाठी सजग असणारे भाजपाचे काही नेते कंबोज यांच्याबाबतीत काहीच गैर मानत नाहीत, हे आश्चर्यच असल्याचं मत भाजपाचे नेत्यांनी मांडले.
अगदी मलिक ड्रग प्रकरणात त्याचेच नाव घेतील याची कुजबुज होत असूनही शुक्रवारी नव्याने भाजपावासी झालेल्या एका नेत्याच्या खासगी पण जाहीर समारंभात कंबोज भाजपाच्या नेत्यांसोबत वावरत होते, असे तेथे उपस्थित असलेल्यांनी सांगितले. कदाचित आमच्या नेत्यांना भाजपा सत्तेत केवळ भाजपाविरोधी नेत्यांवर कारवाई होते, हा आरोप पुसण्यासाठी कंबोज हे सोबत लागत असतील, अशी मिश्किल टिप्पणीही एका मुंबईतील भाजपा पदाधिकाऱ्याने केली.
मोहित कंबोज यांच्याविरोधात सीबीआय कारवाई
- खरंतर भाजपा सत्तेत असताना क्वचितच भाजपा नेत्यांवर कारवाई झाली असेल. पण मोहित कंबोज यांना भाजपात अनेक महत्वाची पदं भुषवली असतानाही सीबीआय कारवाईला तोंड द्यावे लागले होते.
- बँक फसवणूक प्रकरणी सीबीआयने मुंबई भाजपाचे सरचिटणीस असताना जून २०२०मध्ये मोहित कंबोज यांच्या घरावर आणि कार्यालयांवर छापे टाकले होते.
- सीबीआयचे हे छापे कंबोज यांच्या मुंबईतील स्थित असलेल्या पाच ठिकाणी पडले होते.
नाव बदलूनही संपलं नाही संकट…
- मोहित कंबोज यांनी मधल्या काळात आपले नाव मोहित कंबोज ऐवजी मोहित भारतीय असे बदलले.
- त्यांनी तसे का केले त्याबद्दल वेगवेगळ्या चर्चा आहेत. पण तरीही संकंट संपली नाहीत.
- बँक ऑफ बडोदा ने २०१९ मध्ये भाजपा नेते मोहित कंबोज यांना ‘विलफुल डिफॉल्टर’ म्हणून घोषित केले होते.
- बँकेने या संदर्भात कंबोज यांच्या छायाचित्रासह एक जाहिरात जारी केली होती. त्यामुळे त्यात नाव जुने असले तरी फोटो असल्याने बदनामी झालीच.
- कर्ज न भरल्यामुळे बँकेने ती जाहिरात प्रकाशित केल्याचा आरोप केला होता.
- मात्र, कंबोज यांनी तसे घोषित करण्याला विरोध केला आणि प्रकरण न्यायालयीन कारवाईचा इशारा दिला.
मोहित कंबोज यांचं राजकारण
- मोहित कंबोज हे मुळात हिरे व्यवसायातील एक चर्चित नाव होते.
- ‘इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे ते २०१२ ते २०१९ दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष होते.
- २१ सप्टेंबर २०१३ रोजी कम्बोज यांनी भाजपामध्ये प्रवेश केला, महिन्याभरातच त्यांची मुंबई भाजपाचे उपाध्यक्षपदी वर्णी लावण्यात आली. त्यापदावर ते २०१६पर्यंत होते.
- त्यांनी मुंबई भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्षपदही भुषवले आहे.
- दिडोंशी मतदारसंघामधून २०१४साली त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली आहे.
- कंबोज हे २०१६ ते २०१९ दरम्यान भाजयुमोच्या मुंबई युवा शाखेचे अध्यक्षही होते.
- २०१९ मध्ये त्यांना मुंबई भाजपाच्या महामंत्रीपदी नियुक्त करण्यात आले.
- त्यांनी २०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा नेत्यांच्या प्रचार मोहिमांच्या आखणीत महत्वाची जबाबदारी पार पाडली होती.
- २०२०मध्ये सीबीआयने ५७ कोटींच्या बँक घोटाळ्याप्रकरणी ठिकठिकाणी केलेल्या छापेमारीमध्ये कम्बोज यांच्यावरही छापा घालण्यात आला होता.
- त्यानंतर ते सध्या कोणत्या पदावर आहेत की नाहीत याबद्दल स्पष्टता नाही, पण ते आजही भाजपाच्या मोठ्या नेत्यांच्या सोबत जाहीर कार्यक्रमांमध्ये सहभागी होत असतात.
क्लिक करा आणि वाचा एनसीबी काय सांगते – ड्रग पार्टी कारवाई प्रकरणी राष्ट्रवादीच्या मलिकांचे आरोप निराधार आणि चुकीचे!
हेही वाचा मुळातील प्रकरण काय:
नवाब मलिकांचा एनसीबी-बीजेपीवर हल्लाबोल! व्हिडीओ आणि फोटो शेअर करत धक्कादायक गौप्यस्फोट!