मुक्तपीठ टीम
आजवर ऑपरेशन लोटसपासून अनेक पक्षांमधून आमदार फोडत आपला पक्ष मोठा करणाऱ्या भाजपाला ऐन निवडणुकीच्या तोंडावर धक्क्यावर धक्के बसू लागले आहेत. गोव्यात मंत्र्यासह आमदारांनी भाजपाला अखेरचा राम राम केला. तर उत्तरप्रदेशात प्रभावशाली ओबीसी नेत्याने ऐनवेळी मंत्रीपद आणि भाजपाही सोडल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी भाजपाला अखेरचा जय श्रीराम केला आहे. त्यामुळे निवडणुकीला सामोरे जात असतानाच ऐन निवडणुकीत मंत्री-आमदार भाजपा का सोडत आहेत, त्याचा पक्षाला किती फटका बसेल यावर चर्चा सुरु झाली आहे.
उत्तरप्रदेशात मंत्री गेले, आमदारही सोबत! सायकलवर स्वारीची शक्यता!
- उत्तर प्रदेशमध्ये १० फेब्रुवारीपासून होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वीच भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला आहे.
- योगी आदित्यनाथ सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर आणखी तीन आमदारांनी भाजपामधून राजीनामा दिला आहे.
- समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांनी अचानक राजीनामा दिल्याने त्यांचे समर्थकही समोर आले.
- स्वामी प्रसाद यांच्यासह कानपूरमधील बिल्हौर विधानसभा मतदारसंघातील भाजप आमदार भगवती सागर, बांदा येथील तिंदवारी मतदारसंघातील भाजप आमदार ब्रिजेश प्रजापती आणि शाहजहांपूरमधील तिल्हारचे भाजप आमदार रोशन लाल वर्मा यांनी पक्षाला राजीनामे दिले आहेत.
- या सर्वांचे समाजवादी पक्षात जाणे निश्चित आहे.
- रोशनलाल वर्मा यांनी यापूर्वीच समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.
- हे सर्व आमदार स्वामी प्रसाद मौर्य कॅम्पचे आहेत.
गोव्यात मंत्री-आमदार गेले, पर्रिकरांच्या वेळची भाजपा राहिली नसल्याचा घोष!
- गोव्याचे मंत्री आणि भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी सोमवारी प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाचा तसेच विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
- भाजपाने म्हटले आहे की, लोबो यांच्या या निर्णयाचा पक्षाच्या निवडणुकीत परिणाम होणार नाही.
- मी दोन्ही पदांचा राजीनामा दिला आहे, असे लोबो यांनी पत्रकारांना सांगितले.
- मला पुढे काय पावले उचलायची आहेत ते मी बघेन.
- मीही भाजपचा राजीनामा दिला आहे.
- या किनारपट्टीच्या राज्यात भाजपच्या राजवटीवर लोक नाराज असल्याचा दावा त्यांनी केला.
- गोव्यात भाजपचे आमदार अलिना सलदान्हा आणि आमदार कार्लोस आल्मेडा यांनी राजीनामा दिला आहे.
- आमदार अलिना सलदान्हा यांनी पक्ष आणि राज्य विधानसभेचा राजीनामा दिला आणि आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे.
- गोव्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पक्षाला दुसरा मोठा धक्का बसला आहे.
- भाजपचे आमदार कार्लोस आल्मेडा यांनी आमदार पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
- मी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षात प्रवेश करणार असल्याचे प्रवीण यांनी सांगितले. दरम्यान, आपल्याला पुन्हा तिकीट मिळणार नाही, याची प्रवीणला कल्पना असावी, असे भाजपाच्या सूत्रांचे म्हणणे आहे. भाजपाने अलीकडेच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या एका मोठ्या नेत्याला फोडले होते, ज्याच्याकडून एमजीपी मायेम जागेवरून उमेदवारी करण्याचा विचार करत होती.
- अलीकडच्या काळात भाजप सोडणारे प्रवीण हे चौथे आमदार आहेत.