मुक्तपीठ टीम
एकीकडे सार्वजनिक ठिकाणी वावरतानाही समाजातील एक वर्ग मास्क घालण्यास टाळाटाळ करताना दिसतो. त्यात राजकीय नेत्यांपासून ते सामान्यांपर्यंत सर्वच येतात. त्याचवेळी वैद्यकीय तज्ज्ञ घरातही मास्क घालण्याचा सल्ला देत आहेत. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनीही आता घरातही मास्क घालण्याची वेळ आल्याचं म्हटले आहे. महाराष्ट्राचे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनीही घरात मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. घरात तर आपली माणसं असतात तरीही मास्क का घालायचा, हे समजून घेणे आवश्यक आहे. मुक्तपीठनं याविषयीची उपयोगी माहिती संकलित करुन मांडली आहे.
घरामध्ये मास्क घालण्याचा सल्ला का ?
• कोरोना इतक्या वेगाने पसरत आहे की घरातील एखाद्या सदस्याला कोरोना संसर्ग झाला तरी लगेच लक्षात येत नाही.
• अनेकदा त्यातून कोरोनाची लक्षणे लक्षात येईपर्यंत आणि चाचणीचा रिपोर्ट येईपर्यंत घरातील इतर सदस्यांनाही लागण होते.
• असंख्य लोकांना कोरोनाची लागण झाली तरी त्यांच्यात कोणतीही लक्षणे दिसून येत नाही, अशा लक्षणविरहितमध्ये जर घरातील कुणी असेल तर संसर्गाचा धोका असतो.
• दुसऱ्या लाटेत संपूर्ण कुटुंबच्या कुटुंब संसर्गित होत आहेत. त्यात लक्षणविरहित असणे तसेच डबल म्युटंट कोरोना विषाणूचा अतिवेगवान संसर्ग वेग ही कारणे आहेत.
• त्यामुळे घरात मास्क लावणे गरजेचे आहे.
सध्या घरी काय काळजी घ्याल?
• देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे.
• दिवसेंदिवस रुग्ण संख्येची आकडेवारी उच्चांक गाठत आहे, त्याचे कारण संसर्ग झटपट होतो आहे.
• घरी शक्यतो बाहेरच्या कोणालाही बोलवू नका.
• घरातील इतर सदस्यांसोबत खूप जवळून बोलणे टाळा.
• घरातील सदस्यांपासून योग्य अंतर राखा.
• आवश्यक असेल तेव्हाच घरा बाहेर पडा.
• कोरोना संबंधित अवास्तव भीती पसरवू नका, त्यामुळे मानसिक स्थिती खचून कोरोनाशी लढण्याच्या शारीरिक शक्तीवर वाईट परिणाम होऊ शकेल.