मुक्तपीठ टीम
राज्यातील सत्ताधारी महाराष्ट्र विकास आघाडीमधील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांमध्ये अनेक मुद्द्यांवर मतभेद असल्याचे उघड होत असते. तरीही भाजपाला त्याचा फायदा उचलणं शक्य होत नाही, त्याचे कारण तिन्ही पक्षांच्या सत्तेतील नेत्यांचे असलेले मजबूत ऐक्य! मात्र, स्थानिक पातळीवर या एकजुटीला अनेकदा तडे जाताना दिसतात. विशेषत: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये अनेक ठिकाणी खटके उडण्यावरच थांबत नाही तर संघर्षही पेटताना दिसतो. पुण्याच्या खेड, कोकणातील रायगड, रत्नागिरीनंतर आता खानदेशातील जळगावातही शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस सामना सुरु झाला आहे. कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्यानंतर खडसेंना त्यांच्याच घरच्या मुक्ताईनगरात अस्मान दाखवणारे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी नाथाभाऊंचा वाद रंगलाय. त्यात त्यांच्या कन्येनं रोहिणी खडसेंनीही उडी घेतली आहे.
खानदेशात घड्याळाला का बोचला बाण?
- जळगावमध्ये राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा त्यांच्याच घरच्या मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेच्या चंद्रकांत पाटील यांनी पराभव केला होता.
- २०१४मध्ये नाथाभाऊंनी युती तोडण्याची घोषणा केल्याचं शिवसेनेला नेहमीच शल्य आहे.
- त्यामुळे ते भाजपात असताना आणि नंतरही शिवसेनेसाठी कधीच प्रेमाचा विषय नव्हते.
- २०१९च्या निवडणुकीत तर शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी करून नाथाभाऊंना त्यांच्याच मुक्ताईनगरमध्ये घरी पाठवले. नंतर पाटलांना शिवसेनेनं सोबत ठेवलं.
- त्यामुळे खडसे विरुद्ध शिवसेना वैर अधिकच चिघळत राहिलं.
- गेल्या आठवड्यात खडसे आणि शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या स्थानिक निवडणुकीवरून वाद झाला.
- त्यानंतर आता आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ तसंच रोहिणी खडसे यांच्यात सामना रंगत आहे.
आता नवं काय घडलं, का आणखी बिघडलं?
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद चांगलाच पेटला आहे. आमदाराच्या ड्रायव्हरची एका महिलेसोबतची अश्लील ऑडिओ क्लिप असल्याचा दावा खडसे यांनी केला आहे. यावर चंद्रकांत पाटील यांनी देखील एकनाथ खडसे व रोहिणी खडसे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
नेमका वाद कुठून सुरु?
- या वादाची सुरुवात बोदवड नगरपंचायतीच्या प्रचारादरम्यान झालीय.
- मुक्ताईनगर मतदारसंघात अवैध धंदे हे शिवसेनावाल्यांचे आहेत, असा आरोप राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना निवेदन देऊन केला होता.
- त्यानंतर शिवसेनेने देखील अशाच सर्वच्या सर्व अवैध धंदे राष्ट्रवादी वाल्यांचे असल्याचा आरोप केला.
- राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष यांचा आम्ही आदर करतो आम्ही कुठल्या प्रकारे यांच्याशी शाब्दिक चकमक न केल्याचा खुलासा शिवसेनेने केला होता.
- जिल्हा पोलिस अधीक्षकांना शिवसेनेनं देखील निवेदन दिले होते.
काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
- खडसे यांनी एका आमदाराच्या ड्रायव्हरचे महिलेशी अश्लील संबंध असल्याची ऑडिओ क्लिप आपल्याकडे असल्याचा दावा केला होता.
- मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व दोन नंबरचे धंदे हे आमदारांच्या समर्थकांचेच आहेत.
- आम्ही याबाबत तक्रार केल्यामुळे आता पोलीस कारवाई सुरू झाल्याने त्यांचे धाबे दणाणले आहेत.
- यातूनच ते निरर्थक आरोप करत आहेत आपल्यावर कोणत्याही प्रकारचे गंभीर गुन्हे नसून कोण गुन्हेगारी वृत्तीचा आहे हे जनतेला माहिती आहे.
काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
- माता जिजाऊंच्या आम्ही लेकी आहोत असे असताना एखाद्या महिलेच्या अंगावर जर कोणी हात टाकण्याचा प्रयत्न करत असेल ते आम्ही कदापि खपवून घेणार नाही.
- तर, महिलांवर कोणी अत्याचार करत असतील तर मी त्यांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही.
- आमदार चंद्रकांत पाटील यांनी यांनी वेळीच कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना रोखले नाही तर आम्ही महिलांच्या अत्याचाराबाबत चोप दिल्याशिवाय राहणार नाही.
- आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनेचा विपर्यास न करता ते गांभीर्यानं घ्यावे.
- कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना समजून सांगावे एवढीच त्यांना विनंती करते, असं रोहिणी खडसे म्हणाल्या.
चंद्रकात पाटलांची प्रतिक्रिया
- एकनाथ खडसे यांचे संतुलन बिघडले आहे.
- खडसे यांची मुलगी मारण्याची भाषा करते.
- मधल्या काळात ही खडसेंनी माझ्यावर खोटेनाटे आरोप केले होते.
- त्यांची परिस्थिती चोरासारखी झाली आहे.
- खडसेंनी एका महिलेबाबत भाषणात अपशब्द वापरला. त्यामुळे त्यांच्यावर मुंबईत कलम ५०९ खाली गुन्हा दाखल आहे.
- ३० वर्ष तुम्ही लोकप्रतिनिधी होता. पण तुमच्या सारखा खोटारडा माणूस महाराष्ट्राला लोकप्रिय झाला नाही.
- खडसेंचा पोलिसांवर दबाव आहे. दबावाचे राजकारण करून खोटे गुन्हे दाखल करण्याची नीती खडसे कुटुंबीयांची आहे.
- कोणती ऑडिओ क्लिप दाखवता? ऑडिओ क्लिपशी माझा संबंध असला तर मी आमदारकीचा राजीनामा देईल.
शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी….सत्ताधारी आघाडीतील स्थानिक सामना!
- शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अविरत प्रयत्नांमुळे दोन टोकाच्या भूमिका असणारे पक्ष एकत्र आले, सत्तेत बसले, पण मनोमिलन स्थानिक पातळीवर काही झाले नाही.
- त्याचं एक कारण अनेक विधानसभा, लोकसभा मतदारसंघांमध्ये १९९९पासून आजवर या दोन पक्षांमध्ये युती विरुद्ध आघाडीतील लढत होत आली आहे.
- पुणे जिल्ह्यातील खेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांच्याविरुद्ध शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी थेट तक्रार केली.
- मोहितेंनी स्थानिक पंचायत निवडणुकीत शिवसेनेचे बहुमत असतानाही फोडाफोडी करून त्यांच्या पक्षाची सत्ता आणली.
- खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेऊनही आमदार मोहितेंनी त्यांना जुमानलं नाही.
- त्याआधी खासदार अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पदाबद्दल काढलेल्या उद्गारही वादाचा विषय बनले होते.
कोकण
- रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीचे मातब्बर नेते खासदार सुनील तटकरे यांच्याविरोधातील राग शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांनी थेट शरद पवारांवर तोफा डागत व्यक्त केला होता.
- आमचे नेते फक्त बाळासाहेब ठाकरेच, उद्धव ठाकरेच, शरद पवार नाहीत, हे त्यांचे उद्गार गाजले होते.
- शिवसेनेचे आक्रमक आमदार भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही चांगलाच सामना रंगला होता.